अकोला : शहरात रक्तरंजित हत्येच्या थरारामुळे खळबळ उडाली आहे. सेवानिवृत्त अभियंता संजय कौसल यांच्यावर आरोपी महेंद्र पवार याने गंभीर वार करून निर्घृण हत्या केली. संजय कौसल हे सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता म्हणून निवृत्त झाले होते. शहरातील रणपिसे नगरात सोमवारी रात्री हे थरारक हत्याकांड घडले. या प्रकरणात सिव्हिल लाईन पोलिसांनी फरार झालेल्या आरोपीला दोन तासांत अटक केली. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.
शहरातील रणपिसे नगर भागात असलेल्या मुरलीधर टॉवर येथे किरकोळ कारणावरून संजय कौशल व आरोपी महेंद्र पवार यांच्यात वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. आरोपी महेंद्र पवार याने संजय कौसल यांच्या छातीवर आणि डोक्यावर धारदार लोखंडी टिकासने वार करत त्यांची घटनास्थळीच निर्घृण हत्या केली. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. महेंद्र पवार हा सराईत गुन्हेगार असून तो एका प्रकरणात तुरुंगात गेला होता. सध्या तो जामिनावर बाहेर होता. थरारक हत्याकांडाच्या घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठवून पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. या हत्याकांडाची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाली. पोलिसांनी त्याच्या आधारे तपासाची सूत्रे वेगाने फिरवली. फरार झालेला आरोपी महेंद्र पवार याचा शोध घेऊन त्याला दोन तासात पोलिसांनी गजाआड केले. दरम्यान, जुन्या वादातून हे हत्याकांड घडले असल्याची चर्चा आहे. आरोपी महेंद्र पवार याची पार्श्वभूमी ही गुंड प्रवृत्तीची असून त्याने या आधीही एका व्यक्तीवर गंभीर हल्ला केला होता. त्या प्रकरणात तो जामिनावर तुरुंगाबाहेर आला होता. मारेकरी महेंद्र पवार आणि मृत संजय कौसल हे रणपिसे नगरमधील मुरलीधर टॉवरमध्ये राहतात.
जुन्या प्रकरणावरून त्यांच्यात वाद होता. या थरारक हत्याकांडाच्या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. नवे पोलिस अधीक्षक अर्चित चांडक अकोल्यात रुजू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात शहरात थरारक हत्याकांड घडले. शहरात वाढत असल्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचे आव्हान पोलिसांपुढे राहणार आहे. दरम्यान, भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली. प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले.