भंडारा : पहाटे प्रातःविधीसाठी जात असलेल्या एका तरुणावर बिबट्याने झडप घेत त्याच्या हाताला चावा घेतला. हाताला धक्का देत या तरुणाने कशी बशी बिबट्याच्या तावडीतून आपली सुटका केली. आरडाओरड केल्यामुळे बिबट्या पळून गेला. ही घटना नागझिरा वन्यजीव अभयारण्यालगत असलेल्या पिटेझरी येथे घडली. गिरधारी बळीराम उईके (वय ३५, रा. पिटेझरी) असे जखमीचे नाव आहे.
बळीराम उईके हा पहाटे ४:१५ वाजता दरम्यान घराच्या मागे असलेल्या सुलभ शौचालयात जात असताना जवळच दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने गिरधारी भयभीत झाला. त्याने जोरात हाताला धक्का दिला व बिबट्याच्या जबड्यातून त्याचा हात सोडवला. मात्र बिबट्याने हाताला चावा घेतल्यामुळे गिरधारी जखमी झाला. त्याने आरडाओरड करताच कुटुंबीय व शेजारी राहणारे लोक धावून आले. त्यांनी आरडाओरोड केल्यामुळे बिबट्या तेथून पळून गेला.
गिरधारी याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे दाखल करण्यात आले. या घटनेमुळे गावात दहशत पसरलेली आहे. जखमी गिरधारीला वन्यजीव विभागाने पंचनामा करून आर्थिक सहाय्य देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात जंगलाच्या बाहेर येत असतात. त्यामुळे जंगलव्याप्त परिसरातील नागरिकांनी शेतात जाताना सतर्कता बाळगावी, एकट्याने जंगल परिसरात जाऊ नये, असे आवाहन साकोलीचे सहाय्यक वनसंरक्षक संजय मेंढे यांनी केले आहे.