भंडारा : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे एका कामगारावर बिबट्याने हल्ला केल्यानंतर त्या तरुणाने उघड्या हातांनी बिबट्याशी झुंज दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असताना भंडारा जिल्ह्यातही अशीच एक घटना समोर आली आहे.

शेतात गायी म्हशी चराईसाठी गेलेल्या एका ६० वर्षाच्या वृद्धावर बिबट्याने हल्ल्या चढविला. मात्र, बिबट्याचा हल्ला परतवून लावत या वयोवृद्धाने मोठ्या हिमतीने त्याच्याशी दोन हात केले. या झुंजीत ते जखमी झाले तरीही बिबट्याला पळ काढण्यास त्यांनी भाग पडले.

वाघ किंवा बिबट पाहिल्यावर भल्या भल्यांची बोबडी वळते. मात्र भंडाऱ्याच्या या ढाण्या वाघाने बिबट्याला पळवून लावले. भास्कर शिंदे, रा. रामपुरी असे या वृद्धाचे नाव असून सध्या त्यांच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लाखनी तालुक्यातील रामपुरी हे घनदाट जंगलव्याप्त गाव. या परिसरात हिंस्त्र श्वापदांचा कायम वावर असतो. या भागातील अनेक अल्पभूधारक पशुपालनावर उपजीविका करतात. साठ वर्षीय भास्कर शिंदे हे सुद्धा पशुपालक असून त्यांच्याकडे १० ते १२ गायी म्हशी आहेत. मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास दिनचर्याप्रमाणे भास्कर हे स्वतःच्या मालकीच्या म्हशी घेऊन शेताकडे चारण्यासाठी गेले.

शेताच्या लागून असलेल्या नाल्यात दबा धरून बसलेल्या बिबट्याने भास्कर यांच्यावर पाठीमागून उडी मारून हल्ला केला. काहीही कळण्याच्या आत बिबट्याने भास्कर यांच्या हाताला आणि पायाला पंजाने जखमा केल्या. भास्कर सांगतात की, बिबट्या मानगुटीवर बसून माझ्या नरडीचा घोट घेण्याचा प्रयत्न करणार त्या आधीच मी बिबट्याची मानगुट डाव्या हाताने पकडून शेजारी असलेल्या काडीने त्याच्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत मी जमिनीवरही पडलो नाही. पाच ते सात मिनिट बिबट्या सोबत झटापट झाल्यानंतर त्याने पळ काढला.

ही झटापट चालू असताना मी मदतीसाठी हाका मारल्या मात्र आजूबाजूला असलेल्या शेतातून कोणी धावून आले नाही. अखेर मी आरडाओरड करण्यास सुरवात केली. सुदैवाने यात माझा जीव वाचला. माझ्या पशुधनाही इजा झाली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा प्रसंग सांगताना भास्कर शिंदे भेदरले होते. रामपूर हे गाव जंगल परिसरातून वन्य प्राण्यांचे दर्शन नेहमी होते. मात्र, हल्ला करण्याचा प्रकार पहिल्यांदाच झाल्याचे ते म्हणाले. सध्या ते जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचार घेत आहेत.