नागपूर : देहव्यापारातून उपराजधानीत महिन्याकाठी लाखोंची उलाढाल होत असून मुंबईनंतर नागपुरातच सर्वाधिक देहव्यापाराचे अड्डे असल्याची माहिती समोर आली. गुन्हे शाखेने गेल्या तीन वर्षांत ६१ ‘सेक्स रॅकेट’वर छापा घालून ११९ मुली, तरुणी आणि महिलांची देहव्यापाराच्या दलदलीतून सुटका केली.

राज्यात मुंबई, पुणे आणि नागपूर शहरात देहव्यापार मोठ्या प्रमाणात चालतो. देशातील अनेक राज्यातील तरुणींसह विदेशातील तरुणी देहव्यापारासाठी मुंबईपेक्षा नागपूर शहराला पसंती देतात. आंबटशौकिनांची संख्या आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्यामुळे कोलकाता, चेन्नई, काश्मिर, दिल्ली येथील तरुणी देहव्यापारासाठी करारतत्वावर नागपुरात येतात. त्यांच्या संपर्कात नागपुरातील अनेक दलाल असतात. अन्य राज्यातून विमानाने नागपुरात येणाऱ्या तरुणींना तारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात येते. १० ते १५ दिवसांच्या करारावर वारांगणांना हॉटेल किंवा विशेष पार्ट्यांसाठी बोलविण्यात येते. दिल्ली आणि जम्मू काश्मिर राज्यातील तरुणींना सर्वाधिक मागणी मुंबई, पुणे आणि नागपुरात असल्याने शहरात ‘सेक्स रॅकेट’ चालविणाऱ्या दलालांच्या अनेक टोळ्या निर्माण झाल्या आहेत.

या टोळ्यांच्या संपर्कात मोठमोठे व्यापारी, राजकीय पुढाऱ्यांपासून ते मोठे शासकीय अधिकारी असतात. त्यामुळे दलालांची लाखांमध्ये कमाई असते. अधिवेशन काळात दिल्ली, मुंबई, काश्मिरसह अन्य शहरांतील मॉडेल आणि तरुणी नागपुरात येत असल्याची धक्कादायक माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

पीडित मुली पुन्हा दलदलीत

‘सेक्स रॅकेट’वर छापे घालून अल्पवयीन मुली, तरुणींना पोलीस ताब्यात घेतात. त्यांच्यावर गुन्हा दाखल करता येत नसल्यामुळे पीडित म्हणून सुटका केल्या जाते. मात्र, काही दिवसांतच त्याच मुली-तरुणी देहव्यापार करताना पडकल्या जातात. देहव्यापार करताना पकडल्या गेलेल्या मुलींना शासनाकडून शिक्षण-प्रशिक्षण देण्यात येत नाही. त्यामुळे मुली दलालाच्या माध्यमातून पुन्हा देहव्यापारात पोहोचतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘अर्थपूर्ण’ संबंधामुळे फोफावला देहव्यापार

‘सेक्स रॅकेट’ची वाढती संख्या बघता गुन्हे शाखेने सामाजिक सुरक्षा पथक स्थापन केले आहे. यापूर्वी देहव्यापाराच्या अड्ड्यावर सातत्याने कारवाई होत होती. अनेक दलालांना अटक करून पीडित तरुणींची सुटका करण्यात येत होती. परंतु, देहव्यापारातून होणारी लाखोंमध्ये उलाढाल बघता काही पोलीस कर्मचाऱ्यांनी थेट दलालांशी हातमिळवणी केली. त्यामुळे अनेक ब्युटीपार्लर आणि मसाज सेंटरवर काही पोलिसांच्या नियमित भेटी असल्याची माहिती मिळाली आहे.

देहव्यापारावरील कारवाई आकड्यात

वर्षे, गुन्हे, आरोपी, तरुणी
२०२१ – ३२, ७९, ७०
२०२२ – २१, ३६, ३६
२०२३ (मे) – १०, १७, १३