नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपुरात आक्रमक होताना दिसून येत आहे. कधी मराठी भाषेच्या मुद्द्यावर तर कधी नागरी समस्या, प्रशासनातील गैरव्यवहार आदी मुद्यांवर अलिकडे मनसे आंदोलने, मोर्चे काढत आहे. मनसेने २०२३ मध्ये आंदोलन केले आणि त्यांना नागपूर सुधार प्रन्यासचे तत्कालिन सभापती मनोजकुमार सूर्यवंशी यांनी आश्वासन दिले. परंतु ते आश्वासन पाळण्यात आले नाही म्हणून गुरूवारी आंदोलन करत नासुप्रच्या एका अधिकाऱ्याला काळे फासण्यात आले.
मनसेने नासुप्रच्या विभागीय कार्यालयात कार्यरत असलेल्या अधिकारी सुरेश चव्हाण यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत त्यांना काळे फासून निषेध केला. चव्हाण यांना सलग १० वर्षांपासून एकाच पदावर ठेवण्यात आले असून या काळात त्यांनी अनेक भूखंड वाटपांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केल्याचा आरोप मनसेने केला आहे. मौजा-चिखली (देव) येथील खसरा क्र. ८३, ८४/१ वर अनधिकृत अतिक्रमणकर्त्यांना भूखंड देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये घेतल्याचे समोर आले आहे. तसेच, मध्य नागपूरमधील भानखेडा येथे विकास निधी अंतर्गत करण्यात येणारी सिमेंट रस्त्यांची कामे प्रत्यक्षात न करता, नागपूर महापालिकेने केलेल्या कामांचे बनावट देयक तयार करून शासनाची फसवणूक करण्यात आली.
या प्रकारात चव्हाण यांच्यासह काही कंत्राटदारांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. मनसेने या सर्व प्रकरणांवर तातडीने कारवाई करून दोषींवर कठोर शासन करण्याची मागणी केली आहे. याच मुद्यांवर २०२३ ला मनसेने नासुप्रच्या मुख्यालय मोर्चा काढला होता. त्यानंतर चव्हाण यांना निलंबित करण्यात आले आणि परत घेण्यात आले. त्यांना कामावर घेण्यात येऊ नये, अशी मागणी मनसेची होती. त्यांना विनाकारण वेतन देता येणार नाही. म्हणून त्यांना नासुप्रच्या दक्षिण विभागात रूज करवून घेण्यात आले.
परत मनसेने त्यांना कोणत्याही परिस्थिती ज्या भागात त्यांनी कंत्राटादारांना हाताशी धरून गैरव्यवहार केला. तेथे बदल करून नये म्हणून सभापती संजय मिणा यांना निवेदन दिले होते. पण, अलिकडे त्यांना पुन्हा पूर्व विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या पदांवर नियुक्ती देण्यात आली. त्यामुळे मनसेने कार्यालयाच्या परिसरात त्यांना गाठवून त्यांना काळे फासले. या आंदोलनाचे नेतृत्व मनसेचे उमेश उतखेडे आणि दिनेश मांगलेकर यांनी केले.
यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईत मराठीच्या मुद्यांवरून आंदोलन सुरू असताना नागपुरात नागपूर शहर अध्यक्ष विशाल बडगे यांनी दिघोरी येथे महापालिकेच्या निर्माणधिन इमारतीवर मराठी ऐवजी इंग्रजीतून लिहलेल्या नाराजी व्यक्त केली. मंडपे यांनी महापालिकेच्या झोनल अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सार्वजनिक स्वच्छता गृहावर मराठी भाषेचे फलक लावण्याची मागणी केली. अन्यथा या इमारतीचे लोकार्पण करू दिले जाणार नाही असा इशारा दिला होता. त्याचे अद्याप लोकार्पण झालेले नाही.