विठ्ठलवाडा - आष्टी मार्गावर दोन दुचाकींच्या भीषण अपघातात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज, सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. राकेश जधुनाथ अधिकारी (३०) ठाकुरणगर ता. चामोर्शी, अमोल नैताम मु. बेलगटा चारगाव ता. सावली (२७) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, नितेश दामोदर कोवे (२७) मु.चारगाव ता.सावली हा गंभीर जखमी झाला आहे. हेही वाचा >>>विखे पाटील यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र; म्हणाले, “सत्तेसाठी हिंदुत्वाशी फारकत घेणाऱ्यांनी..” तिघेही दोन दुचाकीने आष्टी व गोंडपिपरी अशा विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येत होते. दुचाकी अनियंत्रित झाल्याने दोघांनीही एकमेकांना जबर धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की, दोघांचाही राकेश अधिकारी व अमोल नैताम या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळतात गोंडपिपरीचे ठाणेदार जीवन राजगुरू, प्रशांत नैताम, गणेश पोदाळी घटनास्थळ गाठून मृतकांचे पार्थिव ताब्यात घेत जखमी युवकाला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरीत उपचार सुरू आहे. अधिक तपास ठाणेदार राजगुरू करीत आहे.