चंद्रपूर : वाघाने एक म्हशीवर हल्ला केला व तिला जबड्यात पकडुन शिकार करणार तोच सोबतच्या पाच ते सहा म्हशी वाघाच्या मागे धावल्या. एकाच वेळी इतक्या म्हशी मागे धावल्याचे बघून घाबरलेल्या वाघाने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील वाघाच्या घटनेचा हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर चांगलाच हिट झाला आहे.

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील वाघाच्या कुटुंबाचे वास्तव्य आहे. या परिसरात अनेकांना वाघाने दर्शन दिले आहे. तसेच वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत या परिसरात चार जणांचा बळी घेतला आहे. या परिसरात वाघ, बिबट्या व अस्वलाची दहशत आहे. आज मंगळवारी धुळवडीच्या दिवशी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास वीज केंद्र परिसरातील प्रवेश गेट जवळ काही म्हशी चाऱ्याच्या शोधत फिरत होत्या.

VIDEO ::

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या म्हशींना बघून त्यांच्या मार्गावर असलेल्या वाघाने एका म्हशीला एकांतात गाठत हल्ला केला व जबड्यात पकडुन शिकार करणार तोच सोबत असलेल्या इतर म्हशींना वाघाने सहकारी म्हशीवर हल्ला केल्याचे दिसले. सहकारी म्हशीचे प्राण वाचविण्यासाठी सर्व पाच ते सहा म्हशी एकाच वेळी पट्टेदार वाघाच्या मागे धावल्या. एकाच वेळी पाच सहा म्हशी आपल्याच दिशेने धावत येत असल्याचे बघून वाघाने शिकार सोडून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. या घटनेचे संपूर्ण दृश्य वीज केंद्र परिसरात लावण्यात आलेल्या कॅमेरा मध्ये चित्रित झाले आहे. शिकारीत तरबेज असलेला वाघाला म्हशीनी पळवून लावले. सध्या म्हशी व वाघाचा हा व्हिडिओ समाज माध्यमावर चांगलाच हिट झाला आहे.