वर्धा : पतीपेक्षा मुलांची काळजी अधिक, हे केवळ मानवप्राण्यातच  नव्हे तर प्राणीमात्रात पण असणारे वैश्विक सत्य. घार उडते आकाशी, चित्त तिचे पिल्लापाशी, असे म्हटल्याच जाते. त्याचा अनोखा प्रत्यय गिरड  व खुरसापार परिसरातील जंगलात येत आहे. एक वाघीण व तिचे चार शावक असे कुटुंब. काही दिवसापूर्वी जानेवारी महिन्यात त्यातील एक शावक  रस्त्यावर आले आणि वाहनाच्या धडकेत ठार झाले. एक बच्छडा दिसत नाही म्हणून माता वाघिणीने  आकांत केला. डरकाळ्यांनी पंचक्रोशी हादरवून सोडली. परिसरातील शेती व वाहतूक ठप्प पडली.अपघातस्थळी  बॅरिकेड्स लावून खबरदारी घेण्यात आली होती.

आता  या परिसरात निवांतपणा दिसून येत नाही, तोच वन खात्यास एक नवे नाट्य दिसून येत आहे. वाघीण आणि तिचे तीन पिल्ले भ्रमंतीवर असतांनाच त्याचा सुगावा एका वाघास लागला.  वाघीण पाहून तो प्रणयाराधन  करण्यास  सरसावत  आहे. त्याचा वास वाघिणीस आल्याने ती अधिक सतर्क झाल्याचे पाळत ठेवून असलेले वनाधिकारी  सांगतात. कारण वाघास जवळ येवू नं दिल्यास तो चिडतो. आणि मग शावकांवर  हल्ला करतो. त्यात पिल्लांचा बळी जाण्याची अधिक शक्यता असल्याचे सांगण्यात आले. यात अधिकारी काही करू शकत नाही. मात्र गोपनीय अशी काळजी घेतल्या जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रविवारी या वाघिणीने एका गायीचा फडशा पाडला. आतापर्यंत चार जनावरे या वाघिणीच्या हल्ल्यात बळी गेले आहे. आता वाघापासून दूर जाण्याचा प्रयत्न वाघीण करीत आहे. त्यामुळे तिचा अधिवास रोज बदलत आहे. गिरड परिसर सोडून ती आपल्या पिल्लांसह कदाचित उमरेड जंगलाकडे जाऊ शकते. रविवारच्या हल्ल्यामुळे आणखी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहे. भवनपूर, माजरा, शिरपूर, धोंडगाव, साखर बाहुली या परिसरात गत महिन्यात वाघिणीचा वावर दिसून आला. एका महिलेने तसेच दोन तीन गावकरी हा दावा करतात. ट्रॅप कॅमेरे तसेच पगमार्कच्या आधारे शोधाशोध सूरू असल्याची माहिती आहे. मात्र वाघीण याच परिसरात असल्याचे रविवारच्या हल्ल्यातून दिसून आल्याने ही गावे पुन्हा भयग्रस्त झाली आहे. मात्र शेतीची कामे ठप्प पडल्याने ती एक चिंता दिसून येते. आता त्यात समागमोत्सुक  वाघोबा घात लावून बसले आहे. त्यामुळे एक प्रकारे या जंगलात लपंडावच सूरू झाला आहे.