नागपूर : २१ मे, बुधवारची दुपार नागपूरकरांसाठी काही विशेष ठरली. साधारणत: मे महिन्यात सूर्याकडे चुकुनही न पाहणारे नागपूरकरांचे डोळे आकाशाकडे वळले आणि सूर्याला बघू लागले. आकाशातील दृश्यही नयनरम्य आणि आकर्षक होते. शहरात भरदुपारी १२ वाजताच्या सुमारास अचानकपणे सूर्याभोवती इंद्रधनुष्याचे रिंगण आले. नागपूरकर हे दृश्य बघून चकित झाले आणि याची चर्चा शहरभर सुरू झाली. समाजमाध्यमांवर याची छायाचित्रे आणि व्हिडिओ व्हायरल होताच नागपूरकर या मागील कारणे शोधायला लागले. कुणी याला हवामान बदलाचे संकेत तर कुणी याला चमत्कार म्हणत आहे. अनेकांनी यामागील वैज्ञानिक कारण शोधण्यासाठी गुगलचा वापर केला.

मागील अनेक दिवसांपासून शहरात कधी ऊन तर कधी जोरदार गारपीट बघायला मिळत आहे. काही दिवशी नागपूरकरांनी वादळ-वारा देखील अनुभवला आहे. अशा स्थितीत बुधवारी दुपारी सूर्याभोवतीचे वलय नागपूरकरांसाठी चर्चेचे कारण ठरले.

सूर्याभोवती रिंगण का आले?

या दृश्याला वैज्ञानिक भाषेत ‘सोलर हेलो’ किंवा २२ अंशीय वलय असे म्हटले जाते. सोलर हेलो म्हणजे सूर्याभोवती निर्माण होणारे वर्तुळाकार प्रकाशवलय. यामध्ये इंद्रधनुष्याचे रंग दिसतात, विशेषतः लालसर आतील बाजूला आणि निळसर बाहेरील बाजूला. हे वलय २२ अंश कोनात दिसते, म्हणून याला ‘२२ डिग्री हेलो’ असेही म्हणतात. सोलर हेलो ही एक ऑप्टिकल फिनॉमेना (प्रकाशीय घटना) आहे. जेव्हा सूर्यप्रकाश पृथ्वीच्या वातावरणातील अतिदुर्लभ व उंचावर असणाऱ्या सिरस ढगांमधील बर्फकणांवरून अपवर्तित होतो, तेव्हा हा वलय तयार होतो. सिरस नावाचे ढग हे ५ ते १० किलोमीटर उंचीवर असतात आणि बारीक बर्फाच्या स्फटिकांनी बनलेले असतात. सूर्यकिरणे जेव्हा या स्फटिकांमधून जातात, तेव्हा त्यांचा अपवर्तन होतो व त्या एका विशिष्ट कोनात (२२ अंश) वळतात. परिणामी, आकाशात सूर्याभोवती एक सुंदर, वर्तुळाकार वलय दिसते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोलर हेलो ही काही वेळा हवामानातील बदलाचा सूचक मानली जाते. हे वलय हवामानातील बदल, आर्द्रता वाढणे किंवा पर्जन्याची शक्यता दर्शवते. त्यामुळे या घटनेनंतर पाऊस किंवा वादळ येण्याची शक्यता असते, मात्र हे प्रत्येकवेळी बरोबर ठरतेच असे नाही. दुपारी साधारणतः १२.३० ते १.३० दरम्यान नागपूरच्या अनेक भागांमध्ये सूर्याभोवती हे वलय स्पष्टपणे दिसले. आकाश निरभ्र होते, त्यामुळे हेलोची स्पष्टता अधिक होती. नागरिकांनी याचा आनंद घेत फोटो काढले, व्हिडिओ शूट केले. काहींनी याला धार्मिक किंवा ज्योतिषीय अर्थ लावण्याचा प्रयत्न केला, परंतु वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास ही एक सुंदर आणि नैसर्गिक प्रकाशीय घटना आहे, असे खगोलतज्ज्ञांनी स्पष्ट केले.