भंडारा : मागील काही दिवसात भंडारा जिल्ह्यातील काही डॉक्टरांचे महिलांसोबत असलेले आक्षेपार्ह वर्तन सध्या चर्चेचा विषय बनलेल आहे. काही दिवसांपूर्वी लाखनी तालुक्यातील एका आरोग्य केंद्रातील डॉक्टराचे एका तरुणीसोबत अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर आता भंडाऱ्यातील एका नामवंत डॉक्टर महाशयांचा प्रतापही समोर आला आहे.
भंडाऱ्यातील एक सुप्रसिद्ध डॉक्टर आणि त्याच्याच खाजगी रुग्णालयातील परिचारिका हे दोघेही डॉक्टर महाशयांच्या केबिनमध्ये रासलीला करीत होते. डॉक्टर पती आणि परिचारिकेला नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर डॉक्टर पत्नीची तळपायाची आग मस्तकात गेली आणि नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिने कालीचा अवतार धारण केला. केबिनच्या आत तिने डॉक्टर नवरा आणि परिचारिकेला सुतवण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर दोघांनाही चोप देत तिने रुग्णालयाच्या बाहेर आणले. रुग्णालयात सुरू असलेला हा सर्व तमाशा तेथील कर्मचारी आणि काही रुग्ण व त्यांचे नातेवाईक बघत होते. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि शहरात चर्चेला उधाण आले.
डॉक्टर या पेशाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन अत्यंत आदरपूर्वक असताना काही डॉक्टर या प्रतिमेला काळीमा फासण्याचे काम करत आहेत. वर्षभरापूर्वी भंडाऱ्यातील दोन नामांकित डॉक्टरांचे उमरेड येथील रिसॉर्ट मधील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डॉक्टरांची प्रतिमा मलीन करण्याचे काम काही डॉक्टर करीत असल्याचे चर्चा रंगल्या होत्या. त्या दोन डॉक्टरांच्या विरोधात गुन्हे देखील दाखल झाले होते. दरम्यान भंडारातही आता काही डॉक्टरांचे पराक्रम समोर येत आहेत.
प्राप्त माहितीनुसार, भंडारातील एक नामांकित डॉक्टर हा त्याच्याच खाजगी रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्यासोबत रुग्ण नसताना रासलीला करीत असे. इतर महिला कर्मचाऱ्यांना देखील याबद्दल माहिती होते मात्र कोणीही याबाबत बोलायला तयार नव्हते.
दरम्यान रुग्णालयात असलेल्या डॉक्टर पत्नीला तिच्या डॉक्टर पतिवर संशय होता. त्याला रंगीहात पकडण्यासाठी ती प्रतीक्षेत होती. काल रुग्णालयाचे सीसीटीव्ही फुटेज मोबाईल मध्ये पाहत असताना पत्नीला गडबड जाणवली. तिने कोणतीही पूर्व सूचना न देता तातडीने रुग्णालय गाठले. त्याचवेळी डॉक्टर व त्यांच्या रुग्णालयातील परिचारिका नको त्या स्थितीत डॉक्टर पत्नीला दिसून आले. डॉक्टरचे बिंग फुटले. संतापलेल्या पत्नीने डॉक्टर आणि परिचारिकेला चोप देण्यास सुरुवात केली.
त्यावेळी केबिनच्या आतून मारण्याचे आणि आरडाओरडा करण्याचे आवाज येत होते. संतप्त झालेल्या डॉक्टर पत्नीने दुर्गेचा अवतार धारण करून दोघांनाही केबिनच्या बाहेर आणून चांगलेच चोपले. चार भिंतीतला हा विषय बघता बघता समाज माध्यमांवर सर्वत्र चर्चेचा विषय बनला.हा सुप्रसिद्ध डॉक्टर कोण अशी चर्चा समाज माध्यमांवर रंगू लागली. या सर्व प्रकारामुळे आता डॉक्टरांवरचा विश्वास ढळू लागल्याच्या प्रतिक्रिया ही समाज माध्यमांवर पिंटू लागले आहेत.
या डॉक्टरांकडे जाणाऱ्या महिला रुग्णांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी साकोली येथील एका सुप्रसिद्ध डॉक्टरने त्याच्या रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या एका अल्पवयीन मुली सोबत गैरवर्तन केल्याचे प्रकार देखील उघडकीस आले आहेत. खाजगी रुग्णालयात वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे आता महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही कळीचा मुद्दा झाला आहे. ज्या डॉक्टरांकडे महिला मोठ्या विश्वासाने तपासणी करण्यात जातात त्यांनाही आता अशा डॉक्टरांच्या विकृत वर्तनामुळे असुरक्षित वाटत आहे. दरम्यान या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून डॉक्टरांमध्ये देखील संतापाची लाट उसळली आहे.