या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पात्र विद्यार्थ्यांना डावलून कमी गुण असणाऱ्यांना प्रवेश
नागपूर : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कृषी अभ्यासक्रम पदविका प्रवेश प्रक्रियेतील सरळ प्रवेश (स्पॉट अ‍ॅडमिशन) यादीत अधिक गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना डावलून कमी गुण असणाऱ्यांना प्रवेश दिल्याचा प्रकार समोर आला आहे. आर्थिक देवाण-घेवाण करत पात्र उमेदवारांना डावलण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

शासकीय आणि निमशासकीय नोकरी किंवा कृषी संबंधित व्यवसायामध्येही कृषी अभ्यासक्रम, पदवी, पदविका प्राप्त विद्यार्थ्यांना चांगली संधी असते. त्यामुळे शेकडो विद्यार्थी कृषी प्रवेशाला प्राधान्य देतात. विद्यापीठ अनुदान आयोगाने २०१९ मध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अंतर्गत कृषी पदवी अभ्यासक्रमाची मान्यता नाकारली. मात्र, या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल लक्षात घेता मुक्त विद्यापीठाने आठ विषयांमध्ये कृषी पदविका अभ्यासक्रम सुरू केले. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत मुक्त विद्यापीठाचे हे केंद्र चालवले जाते. या केंद्रातील आठ पदविकांच्या ४८० जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली. मुक्त विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना तीन गुणवत्ता यादीनुसार पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नागपूर येथील महाविद्यालयातील मुक्त विद्यापीठाच्या केंद्रात प्रवेश देण्यात आले. तीन प्रवेश फेरीनंतरही २८ जागा रिक्त होत्या. या जागांसाठी १५५ उमेदवार प्रतीक्षेत होते. या उमेदवारांची प्रतीक्षा यादी १९ सप्टेंबरला जाहीर करण्यात आली. त्यानुसार प्रवेश देण्यात आले. मात्र,  काही विद्यार्थ्यांना कमी गुण असतानाही प्रवेश दिला गेला. हे करताना आरक्षणाच्या नियमालाही बगल दिल्याचे दिसून आले आहे. कृषी अभ्यासक्रमातील या गोंधळामुळे अनेक पात्र विद्यार्थ्यांना डावलण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेमध्ये आर्थिक गैरप्रकार झाल्याचा आरोप केला आहे.

घोळ काय?

सरळ प्रवेशाच्या यादीवर नजर टाकली असता अनेक उमेदवारांना ७५ टक्के गुण होते. असे असतानाही इतर मागासवर्गातील दोन उमेदवारांना ७० टक्क्यांवर तर एका उमेदवाराला केवळ ६१ टक्क्यांवर प्रवेश देण्यात आला.  या विद्यार्थ्यांना कुठल्या आधारावर प्रवेश दिला गेला असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

नियम कोणता?

सरळ प्रवेश प्रक्रियेमध्ये ‘आधी या आधी प्रवेश घ्या’, असा नियम आहे. मात्र, हे करताना प्रतीक्षा यादीतील जे विद्यार्थी उपस्थित असतात त्यांच्या गुणांची टक्केवारी, आरक्षणाचा नियम आदी बाबी तपासूनच प्रवेश दिला जातो. मात्र, मुक्त विद्यापीठाच्या कृषी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेत या नियमाला बगल देण्यात आली आहे.

प्रवेश प्रक्रियेमध्ये कुठलाही  गोंधळ झालेला नाही. प्रवेशाचे सर्व नियम पाळूनच प्रवेश देण्यात आले. हे करताना ‘आधी या आधी प्रवेश घ्या’ हा नियम वापरण्यात आला. टक्केवारी व आरक्षणाचा नियमही पाळण्यात आला आहे. – प्रो. मिलिंद राठोड,  प्रमुख, पीकेव्ही, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्र. 

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abnormalities in the admission process of open university agricultural courses akp
First published on: 22-09-2021 at 00:11 IST