* बांधकामास मंजुरी देण्यासाठी मागितली लाच * अटकेच्या भीतीने शौचालयात लपला

घराच्या बांधकामास मंजुरी देण्यासाठी १६ हजार रुपयांची लाच मागणारा महापालिकेचा कनिष्ठ अभियंता आणि त्याचा साथीदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला. या प्रकरणात एसीबीच्या अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली. रामचंद्र रघुनाथ हटवार (५२) आणि संजय माणिक शेंडे (४२) अशी लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत.

तक्रारदार यांचे धोटे लेआऊट आणि जुनी अजनी परिसरात दोन भूखंड आहेत. या भूखंडांवर त्यांना घर बांधायचे होते. त्यामुळे त्यांनी महापालिकेच्या लक्ष्मीनगर झोनमध्ये अर्ज केला होता. या अर्जावर निर्णय घेण्यासाठी कनिष्ठ अभियंता रामचंद्र हटवार याने त्यांना एका भूखंडाकरिता १० असे एकूण २० हजार रुपयांची मागणी केली. लाच न दिल्यास अर्ज प्रलंबित ठेवण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या तक्रारदाराने एका नातेवाईकाला हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी एसीबीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली. एसीबीने शहानिशा केली आणि त्यानंतर सापळा रचला. आज सोमवारी तक्रारदार हटवार याच्या कार्यालयात गेले असता त्याने पैशाची विचारणा केली. त्यानंतर ते पैसे दलाल संजय याच्याकडे देण्यास सांगितले. पैसे संजयने स्वीकारताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याला रंगेहात पकडले आणि हटवाल यालाही अटक केली. ही कारवाई निरीक्षक मोनाली चौधरी, भावना धुमाळ, प्रवीण पडोळे, रविकांत डहाट, शालिनी जांभूळकर, रेखा यादव, शिशुपाल वानखेडे यांनी केलीे. संजय शेंडेला अटक केल्याची माहिती मिळताच हटवारने कार्यालयातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी कार्यालयाला घेराव घातल्यानंतर तो शौचालयात लपला. पोलिसांनी शौचालयात जाऊन त्याला बाहेर काढले आणि अटक केली.