अकोला : दिल्लीतील टॅटू आर्टिस्टची मूर्तिजापूर येथील हत्या प्रकरणात आरोपी प्रियकराला पोलिसांनी तब्बल ११ महिन्यानंतर मुंबईतून अटक केली आहे. समाज माध्यमातून दोघांची ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. रोजगारासाठी दिल्ली, मुंबई ते मूर्तिजापूर असा दोघांनी प्रवास केला. त्यानंतर दोघांमध्ये वाद निर्माण झाला. या वादातूनच प्रियकराने तिची निर्घृण हत्या केली. दिल्ली येथील रहिवासी टॅटू आर्टिस्ट शांतीक्रिया प्रशांत कश्यप (२६) असे वृत्त तरुणीचे, तर चेतन महादेव शृंगारे असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.
समाज माध्यमातून शांतीक्रिया कश्यप आणि चेतन शृंगारे या दोघांची ओळख झाली. या ओळखीतून दोघांमध्ये मैत्री झाली. कालांतराने मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. एकदा मुंबईत शांतीक्रियाच्या सांगण्यावरून चेतनला तिच्या मित्रांनी मारहाण केली होती. त्यानंतर त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. शांतीक्रिया चेतनला वारंवार शिवीगाळ करत होती. त्यामुळे चेतनच्या मनात राग होता. दरम्यान, चेतनने काम देतो म्हणून शांतीक्रियाला अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापुर शहरात बोलावून घेतले.
शांतिक्रीया २१ जुलै २०२४ रोजी मूर्तिजापूरमध्ये दाखल झाली. चेतन तिला घेऊन वैशाली वाईन बारमध्ये काम मागण्यासाठी गेला होता. मात्र, बार मालकाने काम देण्यास नकार दिला. चेतन पाच ते सहा महिन्यांपूर्वी याच बारमध्ये वेटरचे काम करत होता. त्यानंतर दोघे सोबत राहू लागले होते. काही दिवस ते प्रतीक नगरमधील एका खोलीत एकत्र राहत होते. चेतनला दारूचे व्यसन आहे. २३ जुलै २०२४ रोजी रात्री उशीरा दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. रागाच्या भरात चेतनने तिच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केले. यात तरूणीचा मृत्यू झाला. घटनेनंतर चेतन फरार झाला. चेतन हा मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील हरसूल गावातील रहिवासी होता. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून तो गावात राहत नसल्याची माहिती होती.
आरोपीला पकडण्याचे मोठे आव्हान मूर्तिजापूर पोलिसांपुढे होते. तांत्रिक माहितीच्या आधारावर मूर्तिजापूर शहर पोलिसांनी मुंबई गाठली. सांताक्रुझ पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला. अखेर हत्येचा आरोपी चेतन शृंगारे याला पकडण्यात मूर्तिजापूर पोलिसांना यश आले. आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली. यामध्ये आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. तब्बल ११ महिन्यानंतर आरोपीला अटक केली. या प्रकरणी पुढील चौकशी केली जात आहे.