नागपूर : समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिका संपत नसून महिन्याभरात परिवहन खात्याने अपघात नियंत्रणासाठी वाहनधारकांवर समुपदेशनासह कारवाईचा चाबूक उगारला आहे. महिन्याभरात येथे ५५० वाहनांवर कारवाई झाली. सर्वाधिक कारवाई लेन कटिंग, नो- पार्किंग केलेल्या वाहनांवर आहे.

समृद्धीवरील पहिल्या टप्प्यात नागपूर-शिर्डी दरम्यान महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. या महामार्गातून राज्याच्या विकासाची समृद्धी होणार असल्याचा दावा पंतप्रधानांसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. परंतु, या महामार्गावर अपघातांची मालिका संपण्याचे नाव घेत नाही. त्यानंतर परिवहन खात्याने येथे नियम मोडणाऱ्यांवर सक्तीने समुपदेशनाचा उपक्रम सुरू केला.

नवीन उपक्रमानुसार प्रवेशद्वारावर २ हजार २५७ वाहन चालकांना सक्तीने समुपदेशन दिले गेले. सोबत या सर्व वाहनधारकांकडून वाहतुकीचे नियम तोडणार नसल्याबद्दल प्रतिज्ञापत्रही घेतले गेले. याप्रसंगी जनजागृतीचा एक भाग म्हणून प्रवेशद्वारावर वाहनांच्या मागे परावर्तित टेप नसलेल्या वाहनांवरही टेप चिटकवण्यात आली. तर समृद्धी महामार्गावर २४ एप्रिलच्या पहाटे ६ वाजेपर्यंत अतिवेगाने वाहन चालवणाऱ्या ९२, लेन कटिंग (चुकीच्या पद्धतीने वाहन चालवताना रस्त्यावर लेन बदलणे) २२०, चुकीच्या ठिकाणी महामार्गावर वाहन लावणाऱ्या (नो पार्किंग) १६७, वाहनाच्या मागे रिफ्लेक्टर नसलेल्या ७१ अशा एकूण ५५० वाहनांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे परिवहन आयुक्त कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जीर्ण टायर असलेल्या १३५ वाहनांना प्रतिबंध

समृद्धी महामार्गाच्या प्रवेशद्वारावर वाहनांच्या टायर तपासणीचीही मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार १३५ वाहनांचे टायर जीर्ण (जास्त घासलेल) असल्याचे बघत त्यांना परिवहन खात्याकडून पुढे प्रवासासाठी प्रतिबंध करण्यात आला. १० वाहनांवर नागपूर भागात प्रत्येकी २० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.