नागपूर: उपराजधानीत ७६२ स्कूलबस, स्कूलव्हॅन योग्यता तपासणीविना धावत असल्याचा प्रकार जिल्हा स्कूलबस सुरक्षितता समितीच्या बैठकीत पुढे आला होता. त्यानंतर १० ते १३ जुलै दरम्यान शहरात आरटीओ व वाहतूक पोलिसांनी विद्यार्थ्यांची वाहतूक करताना नियम मोडणाऱ्या ९३८ वाहनांवर कारवाई केली.

आरटीओकडून दोन पथके कारवाईसाठी लावण्यात आले आहे. तर वाहतूक पोलिसांकडूनही शहराच्या वेगवेगळ्या भागात मोठ्या संख्येने भरारी पथके तैनात करण्यात आले आहे. आरटीओकडून गेल्या चार दिवसांमध्ये सुमारे ४८ ऑटोरिक्षा व खासगी वाहने आणि ३३ स्कूलबस आणि स्कूलव्हॅनवर कारवाई केली गेली. त्यापैकी ७० वाहने जप्त करण्यात आली. या सगळ्यांकडून सहा लाखांहून अधिक दंड आकारण्यात आला.

हेही वाचा… चंद्रपूर: आमदार सुभाष धोटे यांची काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

वाहतूक पोलिसांकडूनही चार दिवसांमध्ये २०१ ऑटोरिक्षा, ४०६ स्कूलबस आणि २५० स्कूलव्हॅनवर कारवाई करण्यात आली. या सगळ्यांकडून ३ लाख १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. शहरातील ही कारवाई पोलीस उपायुक्त (वाहतूक शाखा) चेतना तिडके, प्रादेशिक परिवहन अधिकारी (नागपूर) राजाभाऊ गीते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्या नेतृत्वात राबवण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या नियमांचा भंग

कारवाई झालेल्या वाहनांमध्ये क्षमतेहून जास्त प्रवासी बसवणे, वाहनांच्या डिक्कीतही नियमबाह्य बदल करून विद्यार्थ्यांना बसवणे, परवानगी नसतानाही खासगी वाहनात विद्यार्थ्यांची वाहतूक, योग्यता तपासणी नसणे, नियमबाह्य वाहनात अंतर्गत बदल, अग्निशमन यंत्र नसणे यासह इतरही त्रुटी आढळून आल्या.