सयाजी शिंदेंचे वृक्षप्रेम जगजाहीर आहे. हा व्यक्ती फक्त ते प्रेम दाखवतच नाही तर प्रत्यक्ष कृती देखील करतो. त्यामुळे तो फक्त चित्रपटातला ‘नट’ नाही तर खऱ्या अर्थाने निसर्गप्रेमी ‘अभिनेता’ ठरला आहे. निसर्गासाठी सदैव तत्पर असणाऱ्या सच्च्या निसर्गप्रेमीने बीड जिल्ह्यात माळरानावर नंदनवन फुलवले आहे. एवढंच नाही तर देशातील पहिले वृक्ष संमेलन त्याने आयोजित केले आहे. आतापर्यंत साधारण २२ देवराई , एक वृक्ष बँक , १४ गड किल्ले यासोबतच राज्यभरात अनेक ठिकाणी किमान चार लाखांपेक्षा अधिक वृक्षारोपण करणाऱ्या सयाजी शिंदे यांची ‘सह्याद्री देवराई‘ ही संस्था अवघा महाराष्ट्र हरित करण्यासाठी धडपडत आहे. याच सयाजी शिंदेंना विदर्भातील वाघांनी भूरळ घातली आणि ते साहित्य संमेलनांच्या निमित्ताने त्यांनी व्याघ्रदर्शनासाठी बोर व्याघ्रप्रकल्पाकडे पावले वळवली. मात्र, बोर व्याघ्रप्रकल्पाची राणी ‘कॅटरिना’ने त्यांना हुलकावणी दिली. त्यामुळे त्यांचा हिरमोड झाला नाही, उलट निसर्गप्रेमाने ते भारावले. नंतर त्यांची पावले वळली ती उपराजधानीतल्या ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट’ केंद्राकडे.

हेही वाचा >>>प्रेमाला उपमा नाही…! व्हॅलेंटाईन विकमध्ये मूकबधिर प्रेमीयुगुलाचा ‘बोलका’ विवाह; वाचा गोंडपिपरीतील अनोख्या विवाहाची कथा

व्याघ्रदर्शनापेक्षाही वन्यजीवांवरील उपचाराच्या पद्धतीची ओढ त्यांना या केंद्राकडे घेऊन आली. भारतातल्या या पहिला केंद्राला भेट देण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.बोर व्याघ्रप्रकल्पाचे विभागीय वनाधिकारी प्रमोद पंचभाई आणि वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे त्यांना येथे घेऊन आले. देवराई वाचवण्यासाठी आणि वृक्षलागवडीसाठी पुढाकार घेतलेल्या सयाजी शिंदे यांनी या केंद्रातील प्रत्येक गोष्ट उत्सुकतेने न्याहाळली. फक्त न्याहाळलीच नाही तर त्या प्रत्येक प्राण्याविषयी आणि त्याच्या उपचाराविषयी त्यांनी गांभिर्याने जाणून घेतले. वन्यजीवतज्ज्ञ कुंदन हाते यांनी त्यांना या संपूर्ण केंद्राविषयी आणि येथील वन्यप्राणी उपचार पद्धतीविषयी माहिती दिली. वन्यजीव उपचार कार्यात अतुलनीय कार्य करणाऱ्या ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्रातील सर्वांचे त्यांनी कौतुक केले. यावेळी सयाजी शिंदे यांनी त्यांच्या कार्याविषयी सुद्धा सांगितले. हिरवे फुफ्फुसे वाचविणे व त्यात वाढ करणे यात कार्य करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. ट्रान्झिटच्या वनपरिक्षेत्र अधिकारी प्रतिभा रामटेके यांनी त्यांचे रोपटे देऊन स्वागत केले. वन्यजीव बचाव व उपचार कार्यात काम करणाऱ्या सगळ्या योध्यांना शुभेच्छा देऊन त्यांनी रजा घेतली.