पर्यावरण मंत्री असताना नांदगावच्या लोकांच्या समस्या थोड्याफार प्रमाणात का होईना सोडवता आल्या याचे समाधान आहे. सरकार बदलले तरीही कायम मी तुमच्या सोबत राहील. या नवीन सरकारमध्ये काय होईल हे ठाऊक नाही. मात्र, औष्णिक वीज केंद्रातील राखेमुळे त्रस्त असणाऱ्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी येत्या आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार, असे आश्वासन माजी पर्यावरण मंत्री व शिवसेना नेतेआदित्य ठाकरे यांनी दिले.

पर्यावरणमंत्री असताना फेब्रुवारी २०२२ मध्ये ठाकरे यांनी नांदगावला भेट दिली होती. येथील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे किमान ६० ते ६५ टक्के का होईना राखेची विल्हेवाट लागली होती. त्यानंतर सत्ताबदल झाल्यावर शनिवारी दुसऱ्यांदा ते नांदगावात आले. राख बंधाऱ्याशी संबंधीत आणि प्रकल्पग्रस्त स्थानिकांशी चर्चा करुन समस्यांचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी नुकसान भरपाई, रोजगाराचा शब्द पूर्ण करू शकला नाही, कारण सरकार बदलले. आता सरकार कोणतेही असो, पण प्रकल्पग्रस्त लोकांना अजूनही समस्यांना ज्या पद्धतीने सामोरे जावे लागत आहे, त्याची खंत वाटते, मात्र, येथील लोकांसाठी मी कायम लढत राहील, असे असे आदित्य ठाकरे म्हणाले. . यावेळी सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या लीना बुद्धे, नांदगाव सरपंच सोनाली वरखडे, वराडा सरपंच विद्या चिखले, स्थानिक अश्विनी ठाकरे उपस्थित होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गावकऱ्यांनी दिले निवेदन
गावातील लोकांसाठी ‘वॉटर फिल्टर’ची सोय व्हावी, गावातील प्रत्येक घरातील एका व्यक्तीला नोकरी मिळावी, प्रकल्पग्रस्त बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या जागेचा मोबदला मिळावा, महिलांना रोजगार मिळावा आदी मागण्यांशी संबंधित पत्र गावातील लोकांनी आदित्य ठाकरे यांना दिले.