लोकसत्ता टीम
वाशीम : नांदेड घटनेनंतर प्रशासन अलर्ट मोडवर आले असून उपविभागीय अधिकारी ललित वऱ्हाडे व वैशाली देवकर यांनी कारंजा व वाशीम येथील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण आणि जिल्हा रुग्णालयाला भेटी देऊन आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला असता अनेक समस्या समोर आल्या असून रिक्त पदे, यंत्र सामग्री धूळखात पडून असल्याने प्रशासन काय सुधारणा करणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
कारंजा उपजिल्हा रुग्णालय हे १०० खाटांचे आहे. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांची १३ पदे मंजूर असून ४ पदे रिक्त आहेत. काही अधिकारी प्रती नियुक्तीवर आहेत. भुलतज्ञ कार्यरत नाही. सर्जन, फिजिशियन व भुलतज्ञ नाहीत. स्त्रीरोग तज्ञ हे पद कायम स्वरूपी पाहिजे आहे. पॅरामेडीकलची अनेक पदे रिक्त आहेत. सी-आर्म मशीन नसून तिची आवश्यकता आहे. डेंटल चेअर, सोनोग्राफी व सीटी-स्कॅन मशीन आहे. परंतु तिची सेवा पुरविणारी यंत्रणा व्यवस्थित नाही. औषधांचा साठा पुरेशाप्रमाणात आहे. मात्र, सीबीसीसाठी मशीन व केमिकलची आवश्यकता आहे. लॅब मटेरियल आणि रक्त साठवणुकीसाठी पुरेशे अनुदान नसल्याने अनेक अडचणी उद्भवतात. विशेष म्हणजे ऑक्सिजन प्रकल्प सुरू नसल्याचे दिसून आले.
आणखी वाचा-अनेक रेल्वे गाड्या रद्द, प्रवाशांना मनस्ताप; सणासुदीच्या काळात बाहेरगावी जाणाऱ्यांचे हाल
शस्त्रक्रिया गृह १५ वर्षांपासून बंद !
कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालय हे ३० खाटांचे असून वैयक्तिक अधीक्षक हे पद रिक्त आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची तीन पदे मंजूर असून त्यापैकी दोन कार्यरत आहे. येथील शस्त्रक्रियागृह १५ वर्षापासून बंद आहे. ग्रामीण रुग्णालयाची इमारत जुनी झाली आहे.येथे शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर उपलब्ध नाहीत. पोस्टमार्टम रूममध्ये विद्युत व पाण्याची व्यवस्था नाही. रुग्णांसाठी औषधांची मात्र अडचण नसली तरी रिक्त पदे व इतर समस्या असल्याने रुग्णांना विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जन सेवेच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी याकडे लक्ष कधी देणार, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.