प्रथम वर्ष प्रवेशासाठी भटकंती
नागपूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा रद्द केल्याने निकालात मोठी वाढ झाली आहे. तसेच विद्यार्थ्यांचा सामान्य विज्ञान आणि वाणिज्य शाखेकडे जाण्याचा कल वाढत असल्याने अनेक महाविद्यालयांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर प्रथम वर्षांचे प्रवेश फुल्ल झाले आहेत. त्यामुळे प्रथम वर्षांच्या प्रवेशासाठी पालक आणि विद्यार्थ्यांची भटकंती सुरू आहे. विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयांना जागा वाढवून द्याव्या, अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून होत आहे.
बारावीच्या निकालात वाढ झाल्याने पारंपरिक अभ्यासक्रमांना सुगीचे दिवस आले. गेल्या काही वर्षांपासून कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांसहित विधि, बी.सी.ए., बी.बी.ए. आदी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढलेला दिसून येत आहे. त्यानुसार गेल्यावर्षी महाविद्यालयांमध्ये २० टक्के जागा वाढवण्यात आल्या होत्या. यावर्षी त्या २.०७ टक्क्यांनी वाढल्या. परीक्षा रद्द होऊन सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत ही वाढ मोठी आहे. याचा फायदा वाणिज्य आणि विज्ञान शाखेला झाला. गुणपत्रिका मिळताच विद्यार्थ्यांची महाविद्यालयांमध्ये गर्दी वाढली. परिणामी, शहर आणि ग्रामीण भागातील नामवंत महाविद्यालयातील वाणिज्य आणि विज्ञान शाखेसह इतर शाखेचे प्रवेश ‘फुल्ल’ झाले. गेल्यावर्षीही वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या जागा जवळपास पूर्ण भरल्या होत्या. अद्याप बऱ्याच विद्यार्थ्यांना बीकॉम आणि बीएस्सी अभ्यासक्रमात प्रवेश मिळाले नसल्याचे चित्र आहे. यावरून अनेक संघटनांनी महाविद्यालयांमध्ये प्रवेशाचा कोटा वाढवण्यासंदर्भात विनंतीही केली आहे. त्यामुळे अनेक महाविद्यालये शून्य टक्के जागा वाढवून देण्यासाठी प्रस्ताव पाठवणार असल्याची माहिती आहे. प्रथम वर्ष प्रवेशासाठी शेकडो विद्यार्थ्यांची भटकंती थांबवण्यासाठी जागांमध्ये वाढ करणे आवश्यक आहे, हे विशेष.
सर्व अभ्यासक्रमाच्या २० टक्के जागा वाढवा – भाजयुमो
भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी नागपूर महानगरातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना विद्यापीठामधील सर्व अभ्यासक्रमाच्या २०टक्के जागा वाढवण्यात याव्या याकरिता निवेदन देण्यात आले. विद्यापीठामध्ये जागा कमी असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे कठीण होत आहे. त्यामुळे २०टक्के जागा वाढवाव्या, अशी मागणी करण्यात आली. निवेदन देतेवेळी भाजयुमो शहर महामंत्री सचिन करारे, दीपांशू लिंगायत, अमोल तिडके उपस्थित होते.
पदव्युत्तरसाठी प्रथमच प्रतीक्षा यादी
करोनामुळे पदवी अंतिम वर्षांच्या परीक्षा ऑनलाईन झाल्या. ऑनलाईन परीक्षेतील उणिवांमुळे निकालामध्ये मोठी वाढ झाली. सर्वच विद्यार्थी उत्तीर्णही झाले. यामुळे पदव्युत्तर प्रवेशासाठीही यंदा मोठी गर्दी झाली आहे. एम.एस्सी.च्या सर्वच अभ्यासक्रमाला यंदा जागा पूर्ण भरल्या आहेत. बहुतांश महाविद्यालयांमध्ये अद्यापही प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे यंदा प्रथमच पदव्युत्तरच्या जागा वाढीसाठीही मागणी होत आहे.