अकोला : सणासुदीच्या काळात सुरक्षेसाठी अकोला पोलीस प्रशासन ‘दक्ष’ झाले. प्रत्येक गणेश मंडळासाठी दत्तक योजना राबविण्यात आली आहे. प्रत्येक मंडळासाठी अंमलदार कर्तव्यावर ठेवण्यात आला आहे. सीसीटीव्ही व ड्रोनद्वारे नजर ठेवली जात असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली.

१९ सप्टेंबरला गणेशोत्सवाला उत्सहात प्रारंभ झाला. २८ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी व ईद-ए-मिलाद एकाच दिवशी आले आहेत. सणासुदीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने नियोजन केले. प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. गणेशोत्सवादरम्यान पोलीस ठाणे स्तरावर दत्तक गणेश मंडळ योजना राबविण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक गणेश मंडळासाठी एक पोलीस अंमलदार देण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. उत्सवादरम्यान पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांची ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. याद्वारे बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या कर्कश आवाजाचे वाद्य तसेच डिजेधारक यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. उत्सवादरम्यान ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर कायद्यान्वये गुन्हे नोंद केले जाणार आहे. त्यावर आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

हेही वाचा – बहुचर्चीत पीएम विश्वकर्मा योजनेचा फायदा काय, किती जातींना लाभ होणार? वाचा सविस्तर…

उत्सवादरम्यान गर्दीच्या ठिकाणी सायंकाळी महिलांच्या गळ्यातील चेन, मंगळसूत्र चोरीच्या घटना वाढतात. त्यावर आळा घालण्यासाठी दामिनी पथकामार्फत पेट्रोलिंग व बीडीडीएस पथकामार्फत तपासणीचे नियोजन केले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास जलद गती प्रतिसाद मिळवण्याची आखणी करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अकोला शहर, अकोट शहर, मूर्तिजापूर शहर, बाळापूर या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये रूट मार्च काढण्यात आला. विसर्जन मार्गाची पाहणीसुद्धा करण्यात आली आहे. गणेश स्थापनेसह संपूर्ण गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्ही व ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे. समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणारे व धार्मिक जातीय तेढ निर्माण होईल, अशी पोस्ट टाकणाऱ्यांवर सायबर विभाग लक्ष ठेवून असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा – “गोपीचंद पडळकरांना काळं फासा अन् एक लाख मिळवा”, अजित पवार गटातील नेत्याची घोषणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुरक्षेसाठी मोठा फौजफाटा

जिल्ह्यात गणेशोत्सवातील बंदोबस्तासाठी एक डीवायएसपी, १० पीएसआय, एसआरपीएफ ०२ कंपनी, २७५ पोलीस अंमलदार, होमगार्ड ७५० हा बंदोबस्त बाहेरून प्राप्त झाला. जिल्ह्यातील सर्व अधिकारी व १५०० पोलीस अंमलदार हे कर्तव्य बजावत आहेत. सुरक्षेसाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.