नागपूर : सध्या आयपीएलचा थरार अंतिम टप्प्यात आहे. रविवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स इलेवन संघात उपांत्यफेरीचा सामना रंगणार आहे. तीन जून रोजी या दोन संघातून विजयी संघ रॉयल चॅलेंजर बँगलोर संघाशी भिडणार आहे.आयपीएलचा थरार संपताच विदर्भात आणखी एका क्रिकेट लीगचा थरार क्रिकेटप्रेमींना अनुभवायला मिळणार आहे. नागपूरमध्ये आयपीएलचा एकही सामना आयोजित करण्यात आला नाही, मात्र ही संपूर्ण क्रिकेट लीगच नागपूरच्या मैदानात पार पडणार आहे.
५ जूनपासून क्रिकेटयुद्ध
विदर्भ क्रिकेट संघटनेच्या (व्हीसीए) यजमानपदाखाली आयोजित पहिल्या विदर्भ प्रो टी-२० लीग क्रिकेटचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. फ्रँचायझी आधारित पुरुषांच्या सहा आणि महिलांच्या तीन संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेचा पुरुष गटातील सलामीचा सामना ५ जून रोजी पगारिया स्ट्रायकर्स वि. नागपूर टायटन्स यांच्यात दुपारी २:४५ वाजेपासून जामठा स्टेडियम येथे रंगणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ७:४५ वाजेपासून शानदार उद्घाटन सोहळा होईल. १५ जूनपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेतील सर्व सामने जामठा येथे दुपारी २:४५ आणि सायंकाळी ७:४५ या वेळेत होतील. तीन महिला संघांमध्ये प्रत्येकी दोन लढती १० ते १२ जून या कालावधीत दररोज सकाळी ९:१५ वाजता होणार आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावरील संघांमध्ये १५ जून रोजी दुपारी २:३० वाजेपासून अंतिम सामना खेळला जाईल. पुरुष गटातील दोन्ही उपांत्य सामने १३ जून रोजी दुपारी आणि सायंकाळी होतील. अंतिम सामना १५ जून रोजी सायंकाळी ७:४५ वाजेपासून खेळविला जाईल. दरम्यान, शुभंकर (वाघोबा), संघांची जर्सी आणि ‘थीम सॉंग’चे अनावरण करण्यात आले.
चाहत्यांना मोफत प्रवेश
उद्घाटन सोहळ्याची तिकीट विक्री ऑनलाइन उपलब्ध आहे. इतर क्रिकेट सामन्यांना प्रेक्षकांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. व्हीपीटीएल सामन्यांचे थेट प्रक्षेपण डीडी स्पोर्ट्सवर होणार असून, लाईव्ह स्ट्रीमिंग जियो हॉटस्टारवरून होईल. सामन्यांचे समालोचन माजी भारतीय आंतरराष्ट्रीय खेळाडू करणार आहेत. पुरुष संघ व कर्णधार: पगारिया स्ट्राइकर्स (यश कदम), निको मास्टर ब्लास्टर ( जितेश शर्मा), नागपूर टायटन्स (अक्षय वाडकर), भारत रेंजर्स (अथर्व तायडे), नागपूर हीरोज (मंदार महाले), ऑरेंज टायगर्स (दर्शन नलाकांडे) यांचा समावेश आहे. महिला संघात निको मास्टर ब्लास्टर,ऑरेंज टायग्रेस, नागपूर टायटन्स यांचा समावेश आहे.