नागपूर : राज्याचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गृहजिल्ह्यात ग्रामीण भागातील गुन्हेगारीवरही पोलीस यंत्रणांचा अंकूश राहिलेला नाही. शहरापाठोपाठ आता ग्रामीण पोलीस हद्दींमध्येही गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांची हिंमत वाढत असल्याने सामान्यांना जीव मुठीत धरून रहावे लागत आहे.

शेतीत पाण्याचा निचरा करण्यासाठी तयार केलेली नाली बुजवल्याने झालेल्या वादातून पारशिवनी तालुक्यातील सरोडी टोळी येथे एकाला कारची धडक देऊन सख्या पुतण्याने जीवानिशी ठार मारले. पोलिसांनी अटक केली आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी हे खूनी थरारनाट्य घडल्याने गावात खळबळ आहे.

त्यामुळे शेतीच्या वादातला जीवघेणा संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. लालू एकनाथ असे पुतण्याकडून खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मृतक लालू एकनाथ याचा लालू भोयर याच्याशी शेतीशी निगडीत वाद सुरू होता. पोळ्या निमित्त लालू भोयर बाहेरगावी गेला असता एकनाथने त्याच्या शेतातल्या धुऱ्याला लागून असलेली नाली बूजवली. त्यामुळे संतापलेल्या लालू यादवने आधी एकनाथच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली.

जखमी एकनाथला पारशिवनी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तिथेही लालू भोयरने तलवारीने एकनाथवर हल्ला केला. आधीच जखमी लालू एकनाथ यांचा अखेर उपचारादरम्यान रात्री मृत्यू झाला. पोलिसांनी लालू यादव विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

खापरखेडात एकाच दिवशी दोन पिस्तूल जप्त

नव्यानेच पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सामावलेल्या खापरखेडा परिसरातून पोलिसांनी एकाच दिवशी दोघांकडून वेगवेगळ्या कारवायांमध्ये पिस्तुल व काडतुसे जप्त केली. गुन्हे शाखेच्या पथक पाचने रात्री मंगळवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास ही कारवाई केली.

पथकाला कामठी खापरखेडा मार्गावर एक व्यक्ती पिस्तुल बाळगून फिरत असल्याचा सुगावा मिळाला. पथकाने तेथे जाऊन झांगुरसिंग उर्फ विक्की सरनागते (२७, महाजननगर, पारशिवनी) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता कमरेला पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे सापडली. त्याच्याकडून दुचाकी व पिस्तुल जप्त करण्यात आले.

त्यानंतर पोलिसांच्या पथकाने भानेगाव चौक, पारशिवनी मार्ग, खापरखेडा येथे खबऱ्यांच्या माहितीच्या आधारे सुमित संजय सोनवाने (२९, पवनी, देवलापार, रामटेक) याला ताब्यात घेतले. त्याच्या कारची झडती घेतली असता डिकीत पिस्तुल व पाच जिवंत काडतुसे आढळली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून मोबाईल, कार जप्त केले आहेत. दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी खापरखेडा पोलीसाकडे सुपूर्द केले.

अंगावर वीज कोसळून माय-लेकासह मजुर महिला ठार

धापेवाडा परिसरात अवघ्या ३ किलोमिटर अंतरावरील शेतात दुपारी तीनच्या सुमारास कपाशीला खत देत असताना अचानक वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत माय-लेकासह शेजारीच काम करणाऱ्या मजूर महिलेचा होरपळून मृत्यू झाला. बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. वंदना प्रकाश पाटील (४२), ओम प्रकाश पाटील (२२) अशी वीज अंगावर कोसळून दगावलेल्या मृत माय-लेकाची नावे आहेत. तर या दोघांसोबत खत देत असताना निर्मल रामचंद्र पराते (६५) ही मजूर महिलाही होरपळून दगावली.