चंद्रपूर : अतिक्रमणामुळे या शहरातील इरई व झरपट या दोन्ही नद्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. इरई नदी पाठोपाठ झरपट नदी पात्रातही अतिक्रमण होण्यास सुरूवात झाली आहे. महाकाली मंदिर परिसर तथा हनुमान खिडकी भागात सिव्हरेज पाईप लाईन नदी पात्रातून टाकण्यात आली आहे. त्यामुळे ३० फुट नदी पात्र व्यापले गेले आहे. ही पाईप लाईन माती टाकून झाकण्यात आली आहे. नागरिक याचा रस्ता म्हणून उपयोग करित आहे.

अतिक्रमणामुळे या शहरातील इरई व झरपट या दोन्ही नद्यांचे अस्तित्वच धोक्यात आहे. इरई नदी पात्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. रहमतनगर ही वस्ती तर पूर्णपणे नदी पात्रात वसलेली आहे. दरवर्षी पावसाळ्यात रहमतनगर मधील झोपड्यांमध्ये पुराचे पाणी शिरते. त्यामुळे तेथील नागरिकांना इतरत्र हलवावे लागते. गेल्या कित्येक वर्षापासून पावसाळ्यात पुराचे पाणी शिरलेल्या झोपडीतील कुटूंबांना आर्थिक मदत देखील दिली जात आहे.

मात्र नदी पात्रातील या झोपड्या इतरत्र हलविण्यात महापालिकेला अपयश आले आहे. मात्र आता झरपट नदी पात्रात देखील अतिक्रमण होण्यास सुरूवात झाली आहे. झरपट नदीच्या पात्रात सांडपाण्याची पाइपलाइन टाकली आहे. हनुमान खिडकी, महाकाली मंदिर परिसरातून ही पाइपलाइन नदी पात्रातून टाकलेली आहे. जी नदीला समांतर नदी पात्रातून जाते. यामुळे जवळपास ३० फूट नदीपात्र व्यापले गेले आहे.

पाइपलाइन माती टाकून झाकण्यात आली आहे. त्यामुळे तिथे नदी उरलिच नाही, तर थेट रस्ता तयार झालेला आहे. नागरिक त्याचा मागील एक महिन्यापासून रस्ता म्हणून वापर करित आहेत. ही पाइपलाइन पूर्णपणे पुढे सांडपाणी प्रक्रिया संयंत्राला जाऊन मिळताना दिसत नाही. शिवाय आणखी एक रस्ता थेट नदीचे पात्रातून तयार केलेला आहे. जो नदीच्या पात्राला दोन मोठ्या भागांमध्ये विभाजित करत पुढे पुढे पठाणपुरा गेटच्या दिशेने जातो.

नदीच्या पात्रात उन्हाळ्यामुळे फार पाणी नसल्याने रस्त्यामुळे नदी एका बारीक प्रवाहात एकाच बाजूने वाहते आहे. दुसरीकडे असलेले नदीचे किरकोळ पाणी आणि त्यात असलेली जलपर्णी यामुळे एका छोट्या तलावाचे किंवा उथळ जलाशयाचे स्वरूप आलेले आहे. यात माती टाकली की हा परिसर इतर वापरासाठी तसेच अतिक्रमण करण्यासाठी सोयीचा झाला आहे. ज्या बाजूने हे दिसते त्या बाजूने आधीच नदीपात्रात बऱ्यापैकी अतिक्रमण आधीच झालेले आहे. त्यामुळे नदीचे रूपांतरण एका नाल्यामध्ये होईल असे वाटते. पाववसाळयात या नदीला प्रत्येक वर्षी किमान दोन तीन वेळा पूर येतो.

तेंव्हा नदी काठावरील वस्त्यांमध्ये पाणी शिरते. आता या नदीच्या पात्रात जे अतिरिक्त भरण टाकले आहे त्यावरून यापुढे पाणी इतरत्र दुसऱ्या वस्त्यांमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही नदी पुढे इरई नदीला मिळते. प्रत्येक वर्षी पावसाळयात जेव्हा इतर मोठ्या नद्या पाण्याने फुलतात तेव्हा झरपट नदीमध्ये त्यांचे बॅक वॉटर येते. अश्या स्थितीत या नदीमध्ये आज जे भरण भरणे सुरू आहे ते नदीला मारक ठरू शकते. नदीमध्ये येणारे संभावित पाणी पुढे वस्त्यांमध्ये येण्यासाठी सध्याची स्थिती कारणीभूत ठरण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान नदी व पर्यावरण अभ्यासक प्रा. सचिन वझलवार, प्रा. डॉ.योगेश दुधपचारे यांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.