नागपूर : भारतीय सैन्य दलामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विदर्भातील दहा जिल्ह्यांमध्ये यापूर्वीच नोंदणी झालेल्या उमेदवारांसाठी १७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर दरम्यान जिल्हा निहाय निवड प्रक्रिया मानकापूर क्रीडा संकुल येथे पार पाडली जाणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी सोमवारी व्यवस्थेचा आढावा घेतला. विदर्भातून ५९ हजार ९११ उमेदवारांची अग्निवीर निवड प्रक्रियेसाठी नोंदणी केली असून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या शारीरिक स्पर्धा व अन्य बाबींसाठी मानकापूर क्रीडा संकुलाची निवड करण्यात आली आहे. यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा व अन्य व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. त्यांनी संकुलाचीही पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, सैन्य भरती कार्यालय नागपूरचे संचालक कर्नल जगतनारायण, क्रीडा व युवक सेवा नागपूर विभागाचे विभागीय उपसंचालक शेखर पाटीलउपस्थित होते.