अमरावती : शेतीत अनिश्चितता, हवामानाचा लहरीपणा आणि बाजारपेठेतील चढ-उतार यामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी डिजिटल क्रांती घडवून आणण्याच्या उद्देशाने कृषी विभागाने ‘महाविस्तार एआय’ नावाचे अत्याधुनिक अप्लिकेशन विकसित केले आहे.कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित असलेले हे मराठी ॲप, शेतकऱ्यांच्या गरजांसाठी एक ‘वन-स्टॉप सोल्युशन’ ठरणार आहे, ज्यामुळे उत्पादन खर्चात कपात होऊन उत्पन्नात वाढ होण्याचा मार्ग मोकळा होईल. राज्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अधिक उत्पादनक्षम आणि शाश्वत करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी त्वरित उपलब्ध व्हावी यासाठी हे ॲप बनवण्यात आले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी या ॲपचे महत्त्व स्पष्ट करताना, हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांचे जीवनमान सुसह्य करण्यासाठी कसे उपयुक्त ठरेल, असे सांगितले.‘महाविस्तार एआय’ची कार्यप्रणाली आणि फायदे तंत्रज्ञान जोडीला शेतीचे ज्ञान, चॅटबॉट सल्लागार: ॲपमधील एआय चॅटबॉट शेतकऱ्यांच्या वैयक्तिक प्रश्नांना त्वरित, मराठी भाषेत उत्तरे देतो.

रिअल टाइम हवामान : स्थानिक पातळीवरील अचूक हवामान अंदाजांमुळे शेतकरी पेरणी, कापणी आणि खतांचा वापर याचे योग्य नियोजन करू शकतील.

बाजारपेठेची माहिती: स्थानिक आणि राष्ट्रीय बाजारपेठेतील पिकांचे भाव रिअल टाइममध्ये दाखवले जातात, ज्यामुळे योग्य वेळी विक्रीचा निर्णय घेणे शक्य होते.

रोग आणि कीड निदान: शेतकरी आपल्या पिकांचे फोटो अपलोड करू शकतात. ॲपमधील एआय तंत्रज्ञान पिकांवरील रोग आणि किडींचे त्वरित निदान करून त्यावरचे अचूक उपाय सुचवते.

शासकीय योजना: कृषी विभागाच्या विविध योजना, अनुदान आणि पीक विमा योजनांचे सर्व तपशील एकाच ठिकाणी मिळतात.

व्हिडिओ मार्गदर्शन: पिकांची लागवड, खतांचा योग्य वापर, कापणीच्या पद्धती आणि जैविक शेती यावर मराठीत तपशीलवार मार्गदर्शन करणारे व्हिडिओ उपलब्ध आहेत.

उत्पादन खर्च कमी, नफा जास्त:

‘महाविस्तार एआय’मुळे शेतीत मोठा बदल अपेक्षित आहे. चुकीच्या खतांचा किंवा कीटकनाशकांचा अंदाधुंद वापर टाळल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होईल. तसेच, बाजारभावाचा अचूक अंदाज आणि हवामान नियोजनामुळे पीकविक्रीचा योग्य वेळ साधता येईल, ज्यामुळे उत्पन्नात वाढ होईल.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन हे ‘महाविस्तार एआय’ ॲप तातडीने डाउनलोड करावे आणि शेतीतील या डिजिटल क्रांतीचा भाग व्हावे, असे आवाहन केले आहे.