प्रदूषणामुळे दरवर्षी सरासरी ३० लाख नागरिकांचा बळी जातो, हे गेल्या वर्षीच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातून समोर आले होते. तर यंदाच्या नव्या अहवालात दरवर्षी पाच वर्षांखालील १७ लाख बालकांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुन्हा प्रदूषणाचे गांभीर्य समोर आले असून त्याला वेळीच आवर न घातल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, असा इशारा या अहवालातून मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचे हे प्रमाण पाहून धक्का बसणे स्वाभाविक आहे. तरीही त्यापासून कुणीही धडा घेताना दिसत नाही. जागतिक आरोग्य संघटनाच नव्हे तर इतरही अनेक संघटनांनी अनेकदा प्रदूषणाच्या दुष्परिणामांविषयी इशारा दिला आहे. त्यातून धडा घेण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करून प्रदूषणाला हातभार लावला जात आहे. हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण गेल्या काही वर्षांत ३४ टक्क्यांनी वाढले आहे. या वायूचे सर्वाधिक उत्सर्जन अमेरिका आणि त्यानंतर युरोपातील देश, चीन आणि नंतर भारतातून होते. तर हवेच्या प्रदूषणामुळे सर्वाधिक मृत्युमुखी पडणाऱ्या पहिल्या तीन देशांत भारत हा देश चीन आणि रशियानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. हवेचे नियम न पाळल्यामुळे प्रदूषणास हातभार लागत असून, दहापैकी केवळ एकाच देशात हवेचे नियम पाळले जात असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील हवा शुद्ध असे आजवर ढोबळपणे मानले जात होते, पण विकसित देशांच्या तुलनेत गरीब देशातील हवा अधिक प्रदूषित होत चालली असून ग्रामीण भागात त्याहीपेक्षा वाईट स्थिती असल्याचे आता समोर आले आहे. या नव्या अहवालात अस्वच्छ वातावरणामुळे एक चतुर्थाश मुलांचा मृत्यू होतो हे स्पष्ट केले आहे. यावरून ग्रामीण भागातील प्रदूषणाची भीषणता अधोरेखित होते. प्रदूषित हवा, अप्रत्यक्ष धूम्रपान, असुरक्षित पाणी आणि स्वच्छतेचा अभाव प्रदूषणासाठी कारणीभूत आहे. सुमारे ९० टक्के जनता प्रदूषित हवेवर जगत असून केवळ दहा टक्के लोक कमी प्रदूषित वातावरणात राहात असल्याचे सांगितले आहे. प्रदूषण केवळ घराबाहेरच नाही तर घराच्या आतील हवासुद्धा आरोग्यासाठी तितकीच घातक ठरत चालली आहे. या नव्या अहवालात सुरक्षित पाणी आणि स्वयंपाकाच्या स्वच्छ इंधनाचा वापर करून एक महिना ते पाच वर्षांदरम्यानच्या मुलांचा मलेरिया, न्युमोनिया आणि डायरियामुळे होणारा मृत्यू टाळता येऊ शकतो, असे सांगितले आहे. यावरून घरातले प्रदूषणसुद्धा या बालकांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरत असल्याचे स्पष्ट होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air pollution in maharashtra
First published on: 14-03-2017 at 01:14 IST