अकोला : खारपाणपट्ट्यात उन्हाळी ज्वारीचे पीक घेण्यासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये खारपाणपट्ट्यासह जिल्ह्यातील शेतकरी उन्हाळी ज्वारीचे उत्पादन घेण्याकडे वळल्याचे चित्र आहे. परिणामी, यंदा उन्हाळी ज्वारीच्या उत्पादनात भरीव वाढ झाली. मात्र, ज्वारीला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी कायम आहेत.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उन्हाळी ज्वारीच्या प्रयोगाकडे कल आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने देखील संशोधन करून खारपाणपट्ट्यातील जमीन उन्हाळी ज्वारीसाठी फायदेशीर असल्याचे स्पष्ट केले. गेल्या दोन-तीन वर्षांपासून जिल्ह्यात उन्हाळी ज्वारीच्या लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. २०२३-२४ मध्ये रब्बी व उन्हाळी हंगाम मिळून जिल्ह्यात पाच हजार ८०९.५४ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली. यंदा उन्हाळी ज्वारीचे उत्पादन भरीव वाढले. सुमारे ११ हजार ६१९.१८ टन ज्वारीचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. अकोट, अकोला, तेल्हारा व मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक प्रमाणात उन्हाळी ज्वारीची लागवड केल्याने उत्पादन वाढले आहे. अकोला जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांमध्ये गेल्यावर्षी उन्हाळी ज्वारीचे १८ हजार ३७०.७५ क्विंटल आवक झाली होती. यावर्षी आतापर्यंत २५ हजार १८५.१२ क्विंटल आवक झाली असून गेल्यावर्षीच्या तुलनेत उत्पादनात मोठी वाढ झाली. गेल्या १० दिवसांत १० हजार ९४९.१२ क्विंटलची बाजारात आवक झाली. अकोट, अकोला आणि तेल्हारा तालुक्यात सर्वाधिक ज्वारीची आवक होत आहे.

हेही वाचा : बारामतीत प्रचाराला विदर्भातील मविआ नेत्यांची फौज

बाजार समितीमध्ये ज्वारीला सरासरी एक हजार ८५० ते दोन हजार ३७० पर्यंत दर प्राप्त होत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा बाजार भाव कमी मिळत आहे. परिसरातील ज्वारीच पेरा बघता आणखी मोठ्या प्रमाणात ज्वारीची आवक बाजार समितीत होणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांना ज्वारीची आधारभूत किंमत मिळण्यासाठी ज्वारी खरेदीसाठी शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याचे पत्र महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालकांना सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी दिले. जिल्ह्यात तालुकास्तरावर सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्थामार्फत तत्काळ शासकीय ज्वारी खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. उन्हाळी ज्वारीला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष असून आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा : राज्य कंत्राटदार महासंघाचा उद्यापासून काम बंदचा निर्णय; कारण काय? जाणून घ्या…

हमीभावात वाढ, बाजारभाव कमीच

हायब्रीड ज्वारीला २०२२-२३ मध्ये दोन हजार ९७० रुपये हमीभाव होता. यंदा तो तीन हजार १८० रुपये करण्यात आला आहे. ज्वारी मालदांडीला दोन हजार ९९० रुपयांवरून यावर्षी तीन हजार २२५ रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला. हमीभावात वाढ झाली तरी बाजारभाव मात्र कमीच असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

हेही वाचा : नागपूर : आई-वडिलांना बदनामीची धमकी; मुलीचे आठ महिने लैंगिक शोषण

शेतकऱ्यांचा ज्वारीकडे कल वाढल्याचे प्रामुख्याने दिसून येते. बाजार समित्यांमध्ये आवक वाढली आहे. तालुकास्तरावर शासकीय ज्वारी खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी पणन महासंघाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे पत्र पाठवले आहे.

डॉ. प्रवीण लोखंडे, जिल्हा उपनिबंधक, अकोला.