महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरात सुरू आहे. या अधिवेशनात ज्या प्रकारे नेतेमंडळी उपस्थित करत असलेले मुद्दे आणि एकमेकांवर करत असलेले आरोप चर्चेत असतात, त्याचप्रमाणे सर्वपक्षीय नेतेमंडळी एकमेकांना लगावत असलेले टोलेही चर्चेचा विषय ठरतात. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवारांनी आज सभागृहात केलेल्या भाषणादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनाही खोचक शब्दांत टोले लगावले. तसेच, यावेळी बोलताना अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना खोचक सल्लाही दिला. यानंतर सभागृहात तुफान हशा पिकला.

नेमकं काय घडलं?

मंत्रीमंडळ विस्तार आणि सत्ताधाऱ्यांनी मांडलेल्या प्रस्तावांसंदर्भात अजित पवारांनी केलेल्या भाषणात भूमिका स्पष्ट केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणांवर सत्ताधारी बाकांवरील भाजपाचे आमदार टाळ्या वाजवत नाहीत, असा टोला अजित पवारांनी लगावला. “देवेंद्रजी, तुम्ही पाच वर्षं मुख्यमंत्री होतात.एवढ्या महत्त्वाच्या गोष्टी, करोडोंचे प्रस्ताव आज मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सगळ्यांनी मिळून किती टाळ्या वाजवल्या हो? तुमचा तर चेहरा मी सारखा बारकाईनं बघत होतो”, असं अजित पवार म्हणाले.

“हे महाराज रेटून बोलतात आणि तुम्ही…”

“तुम्ही कशाला सांगताय कॅबिनेटला पाठवतो वगैरे. ‘मी कॅबिनेटमध्ये करून घेणार’ असं म्हणा ना. एक मेसेज गेला पाहिजे सगळीकडे. हे महाराज उपमुख्यमंत्री असताना हे रेटून बोलतायत. तुम्ही मात्र जरा मागे मागेच येतायत”, असं अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उद्देशून म्हणाले.

“हे महाराज उपमुख्यमंत्री असूनही रेटून बोलतात आणि तुम्ही…”, अजित पवारांची विधानसभेत टोलेबाजी; मुख्यमंत्र्यांना दिला मिश्किल सल्ला!

देवेंद्र फडणवीसांना टोला

दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना खोचक शब्दांत टोला लगावताना ‘अशा गोष्टी करू नका’ म्हणत मिश्किल शब्दांत विनंतीही केली. “वैनगंगा आणि नळगंगाचं तर या (देवेंद्र फडणवीस) महाराजांनीच लक्षवेधीच्या वेळी सांगून टाकलं. खरंतर अशा गोष्टी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसहीत बाकीच्यांनी न सांगता त्या फक्त मुख्यमंत्र्यांना शेवटच्या दिवशी जाहीर करण्यासाठी ठेवायच्या असतात. देवेंद्रजी, तुम्ही उगीच हात चोळल्यासारखं करू नका. मी बिलंदर शब्द तुमच्यासाठी वापरणार नाही. तो शब्द इथे चालणार नाही. पण तुम्ही अत्यंत हुशारीने सगळ्या गोष्टी सांगता. सगळे खुशीत असतात. असं करू नका. आम्ही अडीच वर्षं दोघं जवळ जवळ बसलो होतो. त्यामुळे मला कधीकधी फार दु:ख होतं, वेदना होतात. त्यामुळे असं करू नका”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.