नागपूर हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून ( १९ नोव्हेंबर ) सुरुवात होणार आहे. त्यापूर्वीच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. बावनकुळेंच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.

नागपूर हिवाळी अधिवेशनापूर्वी अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, “तो त्यांचा पक्षांतर्गंत प्रश्न आहे. त्यांनी कोणाला काय करावे, त्यांचं त्यांनी बगावे. आमचा त्याच्याशी काही संबंध नाही. आम्ही त्यांच्या दोघांमध्ये नाक खुपसायचं कारण नाही. त्यांनी नाकाखालून आमचं सरकार काढलं आहे. त्यामुळे आम्ही तिथे नाक खुपसत नाही,” असा टोला अजित पवारांनी लगावला आहे.

हेही वाचा : …म्हणून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस मुख्यमंत्र्यांकडून आयोजित चहापानावर विरोधकांचा बहिष्कार!

काय म्हणाले बावनकुळे?

एका कार्यक्रमात बोलताना बावनकुळे यांनी म्हटलं की, “जो जो समाज फडणवीस यांच्याकडे गेला, त्या समाजावरील अन्याय दूर करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यामुळे मी भाजाप प्रदेशाध्यक्ष असताना देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजेत. ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. देवेंद्र फडणवीसांमागे सर्वांनी उभं राहिलं पाहिजे. फक्त मुख्यमंत्री पदावर बसवण्यासाठी नाहीतर महाराष्ट्राचं भवितव्य हे देवेंद्र फडणवीसच घडवू शकतात,” असेही बावनकुळेंनी सांगितलं.