लोकसत्‍ता टीम

अमरावती : राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार) गेल्‍या ८ ऑगस्‍टपासून राज्‍यात जनसन्‍मान यात्रा सुरू केली आहे. महिला, तरूण, शेतकरी यांच्‍याशी उपमुख्‍यमंत्री अजित पवार संवाद साधत आहे.

वरूड येथील मेळाव्‍यात बोलताना अजित पवार यांनी कांदा उत्‍पादकांसह विदर्भातील कापूस, सोयाबीन आणि संत्री उत्‍पादक शेतकऱ्यांच्‍या प्रश्‍नांचा उल्‍लेख केला. लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्‍या नाराजीचा फटका बसल्‍याची अप्रत्‍यक्ष कबुली त्‍यांनी दिली. कांदा निर्यातबंदी होऊ नये तसेच सोयाबीन आणि कापसाला योग्‍य भाव मिळावा, यासाठी आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

आणखी वाचा-महाविकास आघाडी महाराष्ट्राला कलंकित करीत आहे, बावनकुळेंची टीका

अजित पवार म्‍हणाले, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वातील सरकार आहे. राज्‍यातही आपली सत्‍ता आहे. दोन्‍ही ठिकाणी सत्‍ता असली, तर विकास कामे खेचून आणता येतात. कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते, त्‍यांच्‍या नाराजीचा फटका महायुतीला बसला. पण, आता कांदा निर्यातबंदी होऊ नये, कापूस, सोयाबीनला योग्‍य भाव मिळावा, या भागात सूतगिरण्‍या उभारल्‍या जाव्‍यात, त्‍यातून रोजगार मिळावा, असा आमचा प्रयत्‍न राहणार आहे.

अजित पवार म्‍हणाले, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना रास्तभाव मिळणे गरजेचे आहे. संत्र्यांवर अत्याधुनिक सयंत्राद्वारे प्रक्रिया करून ज्यूस कॉन्सट्रेट, इसेन्स‍ियल ऑइल, पिल पावडर, पशू खाद्य, ज्यूस, टेट्रापॅक ज्यूस, पेंट बॉटल इत्यादी प्रकारची वेगवेगळी उत्पादने केल्यास संत्रा फळाची मूल्यवृद्धी होऊन त्यापासून शेतकऱ्यांना चांगला अतिरिक्त मोबदला मिळू शकतो. त्यासाठी या भागात संत्रा प्रक्रिया प्रकल्पाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी वरुड-मोर्शी येथे विदर्भ अॅग्रोव्हिजन प्रोड्यूसर कंपनी आणि महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळासोबत भागीदारीद्वारे संयुक्त उपक्रम म्हणून संत्रा प्रक्रिया प्रकल्प राबविण्यात येईल.

आणखी वाचा- गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षकांकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवार म्हणाले, तुम्ही फक्त महायुतीला साथ द्या, लाडकी बहीण योजना कुणीही बंद पाडू शकणार नाही. विधानसभा निवडणुकीत तुम्ही महायुतीला भरभरून मतदान करा. मी शब्द देतो, ही योजना आम्ही पुढील पाच वर्ष सुरू ठेवू, तुम्ही फक्त आशीर्वाद द्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या पुतळ्यावरून विरोधक राजकारण करीत आहेत, कुण्‍याही महापुरूषाचा पुतळा दुर्घटनाग्रस्‍त व्‍हावा, अशी कोणत्‍याही सरकारची इच्‍छा असूच शकत नाही. आम्‍ही सर्वांनी माफी मागितली आहे. या प्रकरणात जे कुणी दोषी असतील, त्‍यांना शिक्षा होईल, असे अजित पवार म्‍हणाले.