अ.भा. मराठी साहित्य संमेलन निवडणूक

महाराष्ट्रीय मराठी संस्कृतीचे एक आगळेवेगळे वैशिष्टय़ समजल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागाच्या दोन माजी विभाग प्रमुखांमध्ये चुरस रंगणार असून समाजमाध्यमांवर त्यांच्या निकटवर्तीयांनी जोरात प्रचार सुरू केला आहे.

पदव्युत्तर मराठी विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. मदन कुलकर्णी आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरणार आहेत. दोघांनीही या वृत्तास दुजोरा दिला आहे. गेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कुलकर्णी उभे राहणार होते. मात्र, त्यांचे मित्र ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांच्या प्रेमापोटी त्यांनी उमेदवारी मागे घेतल्याचे सांगण्यात आले. यावेळी मात्र, काहीही झाले तरी निवडणुकीसाठी उभे राहायचेच, असा चंग बांधून ‘डॉ. मदन कुळकर्णी’ नावाने व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप सक्रिय करण्यात आला आहे. त्यावर गेल्या काही दिवसांपासून ‘मी, प्रा.डॉ. मदन कुलकर्णी (डी.लिट्.) येत्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उभा राहणार आहे. आपल्या सर्वाच्या शुभेच्छांसह आपला सक्रिय पाठिंबा मिळेल, अशी अपेक्षा बाळगतो’, अशी प्रचारकी पोस्ट समाजमाध्यमांवर पुन्हा पुन्हा फिरवण्यात येत आहे. या ग्रुपवर सामावून घेणे किंवा काढून टाकणे हे कामही वेगाने सुरू आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालयही नागपुरात आहे. त्याचा कितपत फायदा घेता येईल, याची चाचपणी कुलकर्णीकडून केली जात आहे. नागपुरातील दोन ज्येष्ठ समीक्षकांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उडी घेऊन साहित्य वर्तुळात खळबळ निर्माण केली आहे. दोन्ही उमेदवारांच्या शिष्यांकडून समाजमाध्यमांवर प्रचार सुरू करण्यात आल्याने भविष्यात हा प्रचार आणखी कोणत्या पातळीवर जाईल, हे बघणेच योग्य राहील.

.. तोवर काहीही बोलायचे नाही -डॉ. कुलकर्णी

डॉ. मदन कुलकर्णी यांनी संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे राहणार असल्याचे सांगून तुर्त महामंडळाने अद्याप कुठल्याही तारखा किंवा आयोजकांच्या नावाने घोषणा केली नसल्याने मी उभे राहणार असल्याचे कुणालाही सांगितले नाही. डॉ. अक्षयकुमार काळे गेल्या नऊ महिन्यांपासून अध्यक्षपदाची तयारी करीत आहेत. ते उभे राहणार असल्याचे १५ दिवसांपूर्वीच कळले. मात्र, जोपर्यंत महत्त्वाच्या तारखा पुढे येत नाहीत. तोपर्यंत याविषयी काहीही बोलायचे नाही, असे ठरवले आहे.

तो त्यांचा अधिकार -डॉ.काळे

डॉ. अक्षयकुमार काळे म्हणाले, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे राहणार असल्याचे मी आधीच ठरवले होते. त्यानुसार मी गेल्या काही महिन्यांपासून प्रचारही सुरू केला आहे. मदन कुलकर्णीही निवडणुकीला उभे राहणार आहेत. तो त्यांचा अधिकार आहे.