नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांच्या निवडणुकांना सुरुवात झाली असून सोमवार ७ नोव्हेंबरपासून पदवीधर गटाच्या दहा नोंदणीकृत जागांसाठी उमेदवारांनी सोमवारी अर्ज दाखल केले. यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने जोरदार शक्तीप्रदर्शन करीत दहाही जागांवर उमेदवारांचे अर्ज दाखल केले.
याशिवाय युवा ग्रॅज्युएट फोरमने चार तर युवा सेनेनेही दहा जागांवर अर्ज दाखल केले. विशेष म्हणजे, शैक्षणिक वर्तुळात कायम चर्चेत राहणारे विष्णू चांगदे, वामन तुर्के, दिनेश शेराम अशा दिग्गजांनी सोमवारी अर्ज भरले.
हेही वाचा >>> नागपूर : हिवाळी अधिवेशन दोनच आठवड्याचे!
नागपूर विद्यापीठाच्या विधिसभा, विद्वत परिषद व अभ्यास मंडळाच्या निवडणुका सुरू आहेत. यामध्ये विधिसभेच्या शिक्षक, प्राचार्य आणि संस्था चालकांच्या गटातून अर्ज दाखल करण्यात आले. यातील काहींचे अर्ज बाद करण्यात आले असून यावर सोमवारी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्याकडे अपील करण्यात आली. यावर मंगळवारी निर्णय जाहीर केला जाणार आहे. या सर्व निवडणुकांमध्ये नोंदणीरकृत पदवीधर गटातून दहा जागांच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून असते. सोमवारपासून पदवीधरच्या जागांसाठी अर्ज करणे सुरू झाले आहे. या निवडणुकीसाठी सहा प्रवर्ग तयार करण्यात आले आहेत. यामध्ये खुला प्रवर्ग, अनुसूचित जाती प्रवर्ग, अनुसूचित जमाती प्रवर्ग, भटक्या जमाती प्रवर्ग, इतर मागासवर्ग प्रवर्ग, महिला प्रवर्ग असे एकूण १० उमेदवार निवडले जाणार आहेत.
हेही वाचा >>> नागपूर : मोबाईलवर गेम खेळताना मुलाला एक फोन आला, त्याला एक ‘ॲप डाऊनलोड’ करण्यास सांगण्यात आले, पुढे झाले असे की…
या दहा जागांसाठी अभाविपने अर्ज केले असून यामध्ये सामान्य गटातून विष्णू चांगदे, अजय चव्हाण, वसंत चुटे, नीलेश गावंडे, मनीष वंजारी तर राखीव गटातून ओबीसी प्रवर्गातून सुनील फुडके, एस.टी प्रवर्गातून दिनेश शेराम, एन.टी. प्रवर्गातून वामन तुर्के, एस.सी. प्रवर्गातून प्रथमेश फुलेकर, महिला प्रवर्गातून रोशनी राहुल खेलकर यांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करताना अभाविपने जोरदार शक्तीप्रदर्शन केले असून यावेळी आमदार रामदास आंबटकर, आमदार समीर मेघे, माजी आमदार अनिल सोले, संजय भेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजू हिवसे हे निवडणूक निर्णय अधिकारी तर उपकुलसचिव प्रदीप बिनीवाले हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम बघत आहेत.
अनेकांचे अर्ज बाद, आज निर्णय
विद्यापीठ प्राधिकरणाच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जाची छाननी झाल्यावर अनेकांचे अर्ज बाद ठरवण्यात आले. प्राचार्यांसाठीच्या महिला प्रवर्गातून श्रद्धा कुमार यांचा अर्ज परीक्षेच्या अनुभवाचे कारण सांगून बाद करण्यात आला. व्यवस्थापन प्रतिनिधी प्रवर्गात अक्षय मोगलेवार यांची कागदपत्रे अपूर्ण असल्याचे तर संस्थेच्या जेंच रिपोर्टमध्ये नाव नसल्याचे सांगत काजोल रोटेले यांचा अर्ज बाद ठरविला. महाविद्यालय प्राध्यापक गटातून मतदारयादीतील स्वत:चा नंबर चुकीचा लिहिल्यामुळे सुनील देशमुख, उज्ज्वल गुल्हाने, राजकुमारी गोसावी, धनश्री बोरीकर यांचे अर्ज बाद ठरवले. पुरुषोत्तम पखारे यांनी मतदार यादीतील अनुक्रमांक न लिहिल्याने तर कन्हय्या दादुरे यांनी अनुमोदकाचा क्रमांकच न लिहिल्याने त्यांचे अर्ज बाद झाले. सुशील मेश्राम यांनी चुकीचे नाव लिहिले. संजय चौधरी आणि धनंजय धोटे यांच्या अध्यापन अनुभवाचे कारण देत त्यांचे अर्ज बाद केले. यातील अनेकांनी कुलगुरूंकडे अपील केले असून त्यांच्या अपिलावर मंगळवारी निर्णय जाहीर करत बुधवारी यादी जाहीर होणार आहे.