अकोला : शहर व जिल्ह्यातील १० पर्यटक नेपाळमधील काठमांडू आणि पोखरा येथे अडकले आहेत. त्यातील पोखरा येथील पाच पर्यटक परतीच्या प्रवासाला निघाले असून उर्वरित पाच पर्यटक काठमांडू येथील हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. नेपाळमधील परिस्थिती निवळत असून अकोल्यातील सर्व पर्यटक सुखरूप आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे यांनी दिली.
नेपाळमधील राजकीय अस्थिरतेमुळे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. तरुणांच्या हिंसक आंदोलनामुळे भारतीय पर्यटक अडकले आहेत. नेपाळच्या बहुतांश भागात जाळपोळ, तोडफोड अशा आक्रमक घटना घडल्या. हिंसक आंदोलनांमुळे नेपाळमधील रस्ते आणि विमान वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे महाराष्ट्रातून पर्यटनासाठी गेलेले सर्व पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणी अडकले आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि भारतीय दूतावास अडकलेल्या पर्यटकांच्या संपर्कात आहेत. दरम्यान, अकोला जिल्ह्यातून १० पर्यटक नेपाळ येथे गेले आहेत. अकोल्यातून रेल्वेने वाराणसी येथे पर्यटक दाखल झाले. त्यानंतर हे पर्यटक नेपाळ येथे गेले.
यामध्ये अकोला शहरातील सात, तर जिल्ह्यातील आलेगाव येथील तीन पर्यटकांचा समावेश आहे. नेपाळ येथील पोखरा शहरामध्ये अकोल्यातील गोविंद जाजू, कमल जाजू, सरला जाजू, विजयश्री जाजू, मंगला कारवा हे पाच जण अडकले होते. गुरुवारी हे पाच पर्यटक भारताच्या दिशेने रवाना झाले आहेत. ते जनकपूर येथे दाखल होतील. त्यानंतर बिहारमधील गया येथे हे पर्यटक येणार आहेत. काठमांडू येथील हॉटेलमध्ये रामकृष्ण निनाळे, सुनील सिंग, सुधाकर वावगे, विजय वीर, अनिल प्रल्हाद राऊत हे अडकले आहेत. ते सर्व सुखरूप आहेत. लवकरच नेपाळमधील सर्व १० पर्यटक जिल्ह्यात दाखल होतील, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे यांनी सांगितले.
सुरक्षित स्थळीच थांबण्याचा सल्ला
नेपाळमध्ये उद्भवलेल्या अस्थिर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावास, काठमांडू व नेपाळ सैन्याशी समन्वय साधून महाराष्ट्रातील पर्यटक व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही सुरू केली. सर्व भारतीय नागरिकांना त्यांच्या सुरक्षित स्थळीच थांबण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्याचबरोबर, नेपाळ सैन्याने राजधानी व प्रमुख शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्था तैनात केली असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. इंडिगो, एअर इंडिया व नेपाळ एअरलाइन्सने काठमांडू येथील विमानतळावर सेवा पुन्हा सुरू केली आहे. भारतीय दूतावास व नेपाळ सैन्याच्या सहकार्याने सुरक्षित निवास, अन्न व प्रवासाची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले.