अकोला : मुसळधार पावसामुळे शेतीमधील पिकांचे अतोनात नुकसान झाले. कपाशी पिकाचे बोंड काळे पडून सडले आहेत. पावसाने शेतकऱ्यांचे सर्वस्व हिरावून घेतले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला. सोयाबीनसाठी सुमारे १५ हजार ४५०, तर कपाशीसाठी २२ हजार ५०० रुपये उत्पादन खर्च शेतकऱ्यांना लागला. कर्जबाजारी होऊन शेतकऱ्यांनी तो खर्च तर केला, आता हाती उत्पादन काहीच लागले नसल्याने जगावे कसे? असा प्रश्न बळीराजापुढे निर्माण झाला आहे.
अकोला जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. काही मंडळांमध्ये अतिवृष्टी देखील झाली. या पावसामुळे शेतीतील उभ्या पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. सर्वत्र मुसळधार पाऊस झाला असून त्याचा पिकांना फटका बसला. बार्शीटाकळी तालुक्यातील धाबा मंडळातील धाबा, चेलका, निंबी, शेलगांव, बोरमळी, चोहोगांव, सायखेडा, जांब वसु, खडकी, लोहगड, धामनधरी, मांडोली गावातील शेतकऱ्यांचे पिके उद्ध्वस्त झाले आहेत. गेल्या आठवड्यात सतत पाऊस सुरू होता. परिणामी, कपाशी पिकाची बोंड काळे पडून ते सडले आहेत. कापणीला आलेल्या सोयाबीनच्या शेंगाला कोंब येऊत ते फुटत आहेत.
शेतकऱ्यांनी मशागत, पेरणी, खत, फवारणी आदींवर खर्च केला. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन पेरणी केली. आता पीक कापणीची तयारी सुरू असतांनाच मुसळधार पाऊस पडल्यामुळे पीक सडले आहे. यावर्षी अतिशय चांगले पिके बहरली होती. शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची चिन्हे होते. पावसाने मात्र शेतकऱ्यांच्या आनंदावर पाणी फेरले. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. शेतकऱ्यांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून पेरणीसाठी काढलेले कर्ज डोक्यावर आहे. त्यातच रब्बी हंगामाची पेरणीची देखील अडचण आहेच. शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडल्याचे चित्र दिसून येते. शासनाने सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी होत आहे.
वन्यप्राण्यांचाही त्रास
निसर्गाच्या अवकृपेमुळे पिकांची हानी होत असतांनाच वन्यप्राण्यांनीही उच्छाद मांडला आहे. त्यामुळे सुद्धा पिकांची नासाडी होत आहे. वनविभागाला तक्रार दिल्यानंतर नुकसानीच्या तुलनेत गुंठ्याप्रमाणे अत्यल्प मदत देण्यात येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
शासनाने भरीव मदत द्यावी
मशागतपासून आतापर्यंत संपूर्ण खर्च केल्यावर पावसाने सर्वस्व हिरावून नेले. सततच्या पावसाने होत्याचे नव्हते झाले. आता शासनाने शेतकऱ्यांना मदत देऊन आधार द्यावा, अशी मागणी चेलका येथील शेतकरी रामेश्वर पाटील यांनी केली.