अकोला : शेअर बाजारातून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून शहरातील एका डॉक्टरची तब्बल ६०.३८ लाखांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात सायबर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास लावला. इंदूर येथील महिला आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे प्रकार सुरू आहेत. शहरातील खदान पोलीस ठाण्यात १२ मे रोजी डॉ. राहुल विलास सुरूशे (वय ३५ रा. रामकृष्ण नगर, मलकापर, अकोला.) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने भ्रमणध्वनीवर संपर्क साधून शेअर बाजारामध्ये गुंतवणूक केली की जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्या अज्ञात व्यक्तीवर विश्वास ठेऊन डॉक्टरने आरोपीच्या सांगण्याप्रमाणे एकूण ६० लाख ३८ हजार २०० रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर डॉक्टरने नफ्याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तरे देण्यात आली. शिवाय, आणखी गुंतवणूक करण्यास सांगण्यात आले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. या प्रकरणी खदान पोलीस ठाण्यात कलम ३१८ (४), बी.एन.एस. सहकलम ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने हा गुन्हा सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, डिजिटल खुणा आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा सुगावा काढण्यात आला. १८ सप्टेंबर रोजी खदान पोलीस ठाण्याचे पोउपनि नरेंद्र पद्मने, पो.अंम. महेंद्र सपकाळ व सायबरचे पोहवा. प्रशांत केदारे, पो.अमं. अतुल अजने, तेजस देशमुख, महिला पो. अंम. सपना अटकलवाड यांचे पथक मध्य प्रदेश इंदूरकडे रवाना झाले. महिला आरोपी तनवीर शहादाब समीर कौसद (वय ४६, रा. बीयाबानी, इंदूर, मध्य प्रदेश) हिला स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले. आरोपी महिलेला अकोल्यात आणल्यावर अटक करून न्यायालयात हजीर करण्यात आले. न्यायालयाने २५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक कोळी, सपोनी मनिषा तायडे, नरेंद्र पद्मने, पो.अंम. महेंद्र सपकाळ, प्रशांत केदारे, अतुल अजने, तेजस देशमुख, सपना अटकलवाड आदींनी केली. या प्रकरणात पोलीस पुढील तपास करीत असून त्या महिला आरोपीने आणखी इतर कुणाला फसवले का? या दृष्टीने देखील माहिती घेतली जात आहे.