अकोला : ऊर्जा क्षेत्रातील निर्मिती, पारेषण व वितरण या तिन्ही वीज कंपन्यात अनेक पद्धतीने सुरु असलेले खासगीकरण, महावितरण कंपनीच्या नफ्याच्या क्षेत्रात खासगी भांडवलदारांना समांतर वीज वितरणाचा परवाना, एकतर्फी पुनर्रचना लागू करणे, वीज कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती योजला लागू करणे व इतर धोरणात्मक विषयावर वीज कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून संप पुकारला आहे.

या संपामध्ये महावितरणच्या अकोला परिमंडळातील ६६ टक्के कर्मचारी सहभागी झाले आहेत. अपवाद वगळता वीज यंत्रणेवर संपाचा फारसा प्रभाव जाणवला नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाचा भंग करत तिन्ही वीज कंपन्यांच्या प्रशासनाने विविध मार्गाने खासगीकरणाची प्रक्रिया सुरू केली आहे.

खासगीकरण व इतर प्रलंबित विषयांवर शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ०९ ऑक्टोबरपासून तीन दिवसाचा संप कृती समितीने पुकारला आहे. महावितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रात समांतर वीज वितरण परवाना देण्यास विरोध, महावितरण कंपनीचे ३२९ उपकेंद्र कंत्राटी पद्धतीने चालविण्यास देण्यास विरोध, महापारेषण कंपनीमधील रु.२०० कोटीच्या वरील प्रकल्प टीबीसीबी माध्यमातून भांडवलदारांना देण्यास विरोध व महापारेषण कंपनी समभाग बाजारात नोंदणी करण्यास विरोध, महानिर्मिती कंपनीचे जलविद्यूत प्रकल्पाचे बीओटी तत्वावर खासगीकरण करण्यास विरोध, वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी यांना राज्य शासनाने मंजूर केलेली सेवानिवृत्ती वेतन योजना त्वरित लागू करणे, ०७ मे २०२१ चा शासन आदेश सुधारित करून मागासवर्गीयांना पूर्वलक्षी प्रभावाने पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करणे तसेच सेवा ज्येष्ठतेनुसार खुल्या प्रवार्गातूनही पदोन्नती देणे, तिन्ही वीज कंपन्यातील वेतंगत १ ते ४ स्तरावरील संवर्गनिहाय रिक्त पदे पदोन्नती सरळसेवा भरती व अंतर्गत भरतीद्वारे भरणे, कंत्राटी व बाह्यस्त्रोत कर्मचारी यांना नोकरीत समाविष्ट करण्याबाबत उपाययोजना करणे, महावितरण कंपनीच्या चुकीच्या पुनर्रचनेच्या प्रस्तावाची अंमलबजावणी त्वरित थांबवणे आदी मागण्यांसाठी आंदोलन व संप पुकारण्यात आला आहे.

कामगारांच्या कुठल्याही आर्थिक मागण्या या संपात नाहीत, असे कृती समितीने स्पष्ट केले. महाराष्ट्रातील तीन कोटीच्या वर असलेल्या वीज ग्राहकांच्या व सामान्य जनतेच्या हिताकरीता वीज कर्मचारी संपावर जात असल्याचा दावा कृती समितीने केला. दरम्यान, महावितरणच्या अकोला परिमंडळातील ६६ टक्के कर्मचारी संपात सहभागी झाले. अकोला परिमंडळातील अकोला, वाशीम व बुलढाणा जिल्ह्यात महावितरणचे तीन हजार ११७ कर्मचारी आहेत. त्यापैकी दोन हजार ०४५ कर्मचारी आज अनुपस्थित होते. एक हजार ०३८ कर्मचारी कार्यरत होते, तर ३४ कर्मचारी रजेवर राहिले. या संपाचा यंत्रणेवर परिणाम झाला नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.