अकोला : सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना वेस्टन कोलफिल्ड लिमिटेड कंपनी (डब्ल्यूसीएल)मध्ये कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात उमेदवारांकडून पैसे उकळणाऱ्या आरोपींनी शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या नावाने धमक्या दिल्याचा आरोप संबंधितांनी केला. गोपीकिशन बाजोरिया यांनी हे आरोप फेटाळून लावत आपला त्या आरोपींशी कुठलाही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले. या प्रकरणी शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

‘डब्ल्यूसीएल’मध्ये कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून नागपूर येथील वासुदेव हालमारे आणि अकोल्यातील आशुतोष चंगोईवाला यांनी कंपनीच्या तोतया अधिकाऱ्यांची नागपूर येथे भेट घालून दिली. नोकरी लावून देण्यासाठी प्रत्येकी १० लाख रुपये उमेदवारांकडून घेण्यात आले. या प्रकाराला आठ महिने झाले. हातचा पैसा गेला, नोकरी तर मिळालीच नाही. त्यामुळे उमेदवारांनी संबंधित आरोपींकडे पैसे परत देण्याची मागणी केली. वारंवार पैसे मागूनही आरोपींनी ते परत देण्यास टाळाटाळ केली. उमेदवारांनी पैशासाठी तगादा लावला.

आरोपी आशुतोष चंगोईवाला याने चक्क शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचे नाव वापरून संबंधित उमेदवारांना धमकावले. अखेर या प्रकरणात फसवणूक झालेल्या उमेदवारांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणात यश गुप्ता, स्वाती ढोरे, समृद्धी पवार, आनंद बोरतने, अक्षय बडगे, अमृता श्रोतरी, राहुल ठाकूर, श्रेयस देशमुख, किरण कोकुलवार, दर्शन धोटे, सौरभ तागडे, शिवम बदरके, श्याम कदम, कविता सपात्कार, मकरंद व्यवहारे, पराग वाघमारे, श्रद्धा वाघमारे, जानवी चक्रपाणी, मयूर बाचांवरे, राकेश शेलार, अशोक लोडम, जयेश खुलेकर, पूजा इंगळे, दीक्षा खुलेकर आणि रोशन तायडे यांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात दोन मुख्य आरोपी व त्यांच्या दोन कुटुंबीयांसह चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलीस पुढील तपास करीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपींचे राजकीय नेत्यांशी संपर्क

बेरोजगारांच्या फसवणूक प्रकरणातील आरोपी आशुतोष चंगोईवाला याचा शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्याशी परिचय असून त्याने त्यांच्याच नावाने उमेदवारांना धमकी दिली. बाजोरिया यांनी संबंधित आरोपीशी अनेक वर्षांपासून संपर्क नसल्याचे स्पष्ट केले. दुसरा आरोपी वासुदेव हालमारे याचे देखील नागपूर येथील काही राजकीय नेत्यांशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात देखील खळबळ उडाली. गुन्ह्याची व्याप्ती राज्यभर असण्याची शक्यता सुद्धा व्यक्त केली जात आहे.