अकोला : एका विमा कंपनीतील व्यवस्थापक तरुणीवर त्याच कंपनीच्या एजन्टने भरदिवसा कारमध्ये अतिप्रसंगासाठी जोर जबरदस्ती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

तरुणीने मोठ्या हिम्मतीने आरोपीच्या गुप्तांगावर वार करून स्वत:ची सुटका करून घेतली. या प्रकरणाची पोलीस तक्रार होऊ नये म्हणून आरोपीने तरुणीवर मोठा दबाव टाकला. अखेर तरुणीने सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपीविरोधात तक्रार दिली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला गजाआड केले आहे.

अल्पवयीन मुली, तरुणी व महिलांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला. समाजात वावरत असलेल्या नराधमांची महिलांवर वाईट नजर असते. त्यातून ते कुठलीही नीच पातळी गाठू शकतात. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. अकोला शहरात घडलेल्या एका घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. एका विमा कंपनीमध्ये शाखा व्यवस्थापक पदावर कार्यरत २२ वर्षीय तरुणी १६ जून रोजी कार्यालयात कर्तव्यावर होती. कंपनीचा एजन्ट गणेश ठाकूर याने ग्राहकाची भेट घ्यायची असल्याचे सांगून व्यवस्थापक तरुणीला सोबत नेले.

कार्यालयीन काम आटोपल्यानंतर सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास शहरातील जठारपेठ चौकात आरोपीने गाडी थांबवली. गाडीच्या मागच्या सीटवर आरोपीने तरुणीचा हात पकडून तिच्यावर अतिप्रसंग करण्यासाठी जबरदस्ती करू लागला. तरुणीने विरोध करून प्रतिकार केला. पीडित तरुणीने आरडाओरड केल्यावर तिचे तोंड दाबून आरोपीने मारहाण केली. आरोपीने बळजबरीने शरीर सुख मिळवण्याचा प्रयत्न केला. पीडित तरुणीने या गंभीर प्रसंगापुढे खचून न जाता प्रतिकार केला.

आरोपीच्या गुप्तांगावर जोरदार वार तरुणीने केला. त्यानंतर तरुणीने कारमधून स्वत:ची सुटका करून घेतली. या प्रकाराचा तरुणीला जबर धक्का बसला. तरुणीने पोलिसात धाव घेतली तर आपल्या विरोधात कारवाई होईल म्हणून आरोपीने पीडितेला धमकवण्यास सुरुवात केली. आरोपीने पीडित तरुणीच्या भ्रमणध्वनीवर संदेश पाठवून धमकावले. या प्रकरणात बदनामी करेल, आत्महत्या करून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी आरोपीने पीडित तरुणीला दिली. त्यामुळे पीडित तरुणी प्रचंड दबावात आली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अखेर तरुणीने आरोपीविरोधात सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याची गंभीर दखल घेत पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ७५(२), ७६, ३५१(२)(३) अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेत वापरलेली गाडी देखील पोलिसांनी जप्त केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.