अकोला : शहरातील कावड व पालखी महोत्सवात डाबकीरोडवासी मंडळाची कावड गांधीग्रामकडे जात असताना दगडी पुलावर ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने मोठा अपघात झाल्याची दुर्घटना रविवारी मध्यरात्री घडली. या अपघातात १५ शिवभक्त जखमी झाले आहेत. जखमींवर शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. या अपघाताची माहिती मिळताच भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना दिल्या. सर्व जखमी शिवभक्तांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

श्रावणात महादेवाच्या दर्शनासाठी सर्वत्र भाविकांची गर्दी असते. अकोल्यातील राजराजेश्वराचा कावड महोत्सव पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक जमतात. शेवटच्या श्रावण सोमवारनिमित्त अकोल्यात मध्य भारतातील सर्वात मोठा कावड महोत्सव असतो. त्या पार्श्वभूमीवर गांधीग्राम येथून पूर्णा नदीचे जल आणून शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला जलाभिषेक करण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. शेकडो कावड मंडळातील शिवभक्त रविवार सायंकाळपासूनच गांधीग्रामकडे रवाना झाले. दरम्यान, शहरातील सर्वात मोठे डाबकीरोडवासी मंडळाची कावड गांधीग्रामकडे रविवारी सायंकाळी रवाना झाली. मार्गात दगडी पुलावर कावड मंडळाच्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने मोठा अपघात घडला.

या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून इतर १४ शिवभक्त जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. जखमींना तत्काळ सर्वोपचार रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. काही जखमींना खासगी रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे. अपघातातील जखमींची प्रकृती स्थिर व धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. या अपघातामुळे कावड यात्रा काही काळ थांबविण्यात आली होती.

अपघातानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्यावर पुन्हा कावड यात्रेला सुरुवात झाली. दरम्यान, भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी तत्काळ परिस्थितीचा आढावा घेतला. या दुर्दैवी अपघातामध्ये जखमी झालेल्या सर्व शिवभक्तांवर मुख्यमंत्री सहायता निधीतून उपचार केले जातील, अशी माहिती आमदार रणधीर सावरकर यांनी दिली.

दरम्यान, शेवटच्या श्रावण सोमवारी कावड महोत्सवात शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला हजारो भरण्याचा जलाभिषेक केला जात आहे. भर पावसात शिवभक्तांच्या उत्साहाला उधाण आले असून सर्वत्र ‘हर हर महादेव’चा गजर सुरू आहे. शहरातील कावड व पालखी महोत्सवाच्या संपूर्ण मार्गाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले. भाविकांच्या गर्दीने रस्ते फुलून गेले आहेत. पोलिसांकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.