अकोला : पत्नी व सासरच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप करीत एका विवाहित तरुणाने रेल्वे गाडीपुढे झोकून देत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी चित्रफित तयार करून तरुणाने आपल्या भावला पाठवली. त्यामध्ये तरुणाने टोकाचा निर्णय घेण्यामागील कारण स्पष्ट केले असून दोषींवर कारवाईची मागणी केली. संघपाल खंडारे असे आत्महत्या केलेल्या विवाहित तरुणाचे नाव आहे.

बाळापूर तालुक्यातील पारस येथील रहिवासी संघपाल खंडारे ऑटो चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. तरुणाचा पत्नीसोबत वाद झाला. त्यामुळे तरुण मानसिक तणावात होता. त्यातून तरुणाने आत्महत्या केली. आत्महत्यापूर्वी चित्रफित बनवत तरुणाने पत्नीसह सासरच्या मंडळींवर मारहाण केल्याचा आरोप केला आहे. पत्नी व सासरच्या सहा ते सात लोकांनी आपल्याला मारहाण केली. तीन लाखाचे कर्ज देखील काढायला लावले.

सासरच्या लोकांपासून आपल्या जीवाला धोका असल्याचे तरुणाने चित्रफितीमध्ये म्हटले आहे. ही चित्रफित आपल्या भावासह त्याने नातेवाईकांना पाठवून आत्महत्याला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. दरम्यान, या प्रकरणात रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी आत्महत्येला जबाबदार असलेल्या लोकांवर गुन्हे दाखल करून आरोपींना अटक केली. यामध्ये पत्नी, सासूसह तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून शोककळा पसरली आहे.

शेवटच्या व्हिडिओमध्ये तरुण नेमकं काय म्हणाला?

आत्महत्या करण्यापूर्वी विवाहित तरुणाने ५८ सेकंदाची चित्रफित तयार केली. ती त्याने भावाला पाठवली आहे. ‘दादा मी काय म्हणतो ते कान देऊन ऐक, माझे आणि पत्नीचे भांडणं झाले. त्यानंतर तिचा चुलत भाऊ, सख्खा भाऊ त्यांचे मित्र अशी मिळून चार ते पाच जणांनी मला बेदम मारलं आणि मला आठ दिवसांपूर्वी तीन लाख रुपयांचे कर्ज काढायला लावलं, ते मला जगू देत नाहीत. मला ते धमक्या देत आहेत. पत्नी, तिचा भाऊ, तिची आई, तिची बहिण, तिच्या भावाचे मित्र असे सहा ते सात जण आहेत. ते मला मारून टाकतील, त्याआधी मी माझा जीव देतो, मी मेल्यावर त्यांना सोडू नको. हा व्हिडीओ तू पोलिसांना दाखव आणि तिच्यावर केस कर, कसंही कर, जातो दादा, आई आणि बाबाला तू सांग, बाय बाय,’ असे तरुणाने शेवटच्या चित्रफितीमध्ये म्हटले आहे.