अकोला : ‘एम.डी. ड्रग्स’ प्रकरणात खदान पोलिसांनी दोघांना अटक केली. तिसरा आरोपी अद्याप फरार आहे. या प्रकरणातील आरोपी गब्बर जमादारचे शिवसेनेचे माजी मंत्री, माजी आमदार यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचे समाेर आले आहे. या नेत्यांसोबतचे त्याचे छायाचित्रही समोर आले आहेत. याशिवाय पोलिसांसोबत देखील त्याचे मधूर संबंध असून पोलीस अधिकाऱ्यांची पैशांनी ओवाळणी करताना आरोपीची चित्रफीत समाज माध्यमातून प्रसारित झाली. दरम्यान, आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे तीन पथके वेगवेगळ्या दिशेने रवाना झाले आहेत.
शहरातील गोरक्षण मार्गावर दोन जण अंमली पदार्थ बाळगून असल्याची माहिती खदान पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्यांची झडती घेतली. आरोपी मोहम्मद यासीन मोहम्मद आसिफ, मुस्ताक खान हादिक खान यांच्याजवळ अंमली पदार्थ ‘एम.डी. ड्रग्स’ ४६ ग्रॅम ३० मिली ग्रॅम आढळून आले. त्याची किंमत दोन लाख ३० हजार, दोन दुचाकी, भ्रमणध्वनी असा एकूण तीन लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींसह गब्बर जमादार या तिघांविरोधात खदान पोलीस ठाण्यात कलम ८ (क) २१ (क) एन.डी.पी.एस. ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला. फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपी गब्बर जमादारचे अनेक कारनामे समोर आले आहेत. एका मिरवणुकीत जमादार हा उरळ पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार गोपाल ढोले आणि पीएसआय कायंदे यांची नोटांची ओवाळणी करताना चित्रफितीमध्ये दिसून येत आहे. वाढदिवसाचा केक कापतांना गब्बर जबादारच्या कार्यकर्त्याच्या हाती तलवार असलेले छायाचित्रही समोर आले. ड्रग्स प्रकरणातील आरोपी गब्बर जमादार हा वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता असल्याचे बोलले जात होते. मात्र, पक्षाशी त्याचा कुठलाही संबंध नसल्याचे वंचित आघाडीकडून स्पष्ट करण्यात आले.
शिंदे शिवसेनेचे आमदार तथा माजी मंत्री अब्दुल सत्तार आणि आरोपी गब्बर जमादार या दोघांचे छायाचित्रही समोर आले आहे. माजी आमदार बळीराम सिरस्कार यांच्यासोबतचे देखील त्याचे छायाचित्र आहे. ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपी गब्बर जमादार याचे अनेक राजकीय नेत्यांशी संबंध असल्याची माहिती आहे. ‘एम.डी. ड्रग्स’ प्रकरणात आरोपी गब्बर जमादार याला पकडण्यासाठी पोलिसांनी तीन पथके गठीत केले असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे.