अकोला : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणारी शहानूर येथील जंगल व नरनाळा किल्ला सफारी १ मेपासून बंद होती. नरनाळा वन पर्यटन संघटनेच्या जिप्सी चालकांनी भाडेवाढ करण्याच्या मागणीसाठी बंद पुकारल्याने गेल्या १३ दिवसांपासून सफारी बंद असल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला होता. यासंदर्भात अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी मध्यस्थी करून मागण्यासंदर्भात वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर जिप्सी चालकांनी आपला संप मागे घेतला असून १४ मेपासून पुन्हा सफारीला प्रारंभ झाला. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत अकोट वन्यजीव विभागामध्ये नरनाळा किल्ला व शहानूर येथील जंगलाचा समावेश आहे.
नरनाळा किल्ल्याच्या पायथ्याशी शहानूर येथे वन पर्यटन केंद्र असून त्या ठिकाणावरून नरनाळा किल्ला व शहानूर जंगलासाठी सफारी सोडली जाते. गेल्या १३ दिवसांपासून ही सफारी बंद होती. विविध मागण्यांसाठी नरनाळा वन पर्यटन संघटनेने संप पुकारला होता. इंधनाचे वाढलेले दर लक्षात घेता व पर्यटन मार्गात नव्याने वाढ झाल्यामुळे शहानूर सफारीचे केवळ जिप्सी प्रवास भाडे अडीच हजारावरून चार हजार व नरनाळा किल्ला सफारीचे दीड हजारावरून अडीच हजार करण्याची मागणी संघटनेने केली.
करोना काळामुळे बंद केलेली रात्रीची सफारी व पूर्ण दिवसाची सफारी सुरू करण्यात यावी, नरनाळा परिक्षेत्रातील बफर क्षेत्रात मचाण सुरू करावे, शहानूर सफारी द्वारावरील गाईड व जिप्सी चालक यांना गणवेश व ओळखपत्र द्यावे, शहानूर सफारी मार्गावरील खासगी सर्व वाहने बंद करण्यात यावे, शहानूर सफारी द्वार ते नरनाळा किल्ला दरम्यान रस्त्याचे डांबरीकरण होत असल्यामुळे पावसाळ्यात नरनाळा किल्ला सफारी सुरू ठेवावी, जिप्सी गाईड व जिप्सी चालक यांना प्रशिक्षण देण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन संघटनेच्यावतीने अकोट वन्यजीव विभागात ११ एप्रिलला देण्यात आले होते. या मागण्यांची दखल न घेतल्यास १ मेपासून शहानूर येथील सफारीसाठी बंद पुकारला होता.
ऐन हंगामाच्या काळात पर्यटक व वन्यजीव प्रेमींची निराशा होण्यासोबतच स्थानिकांचा रोजगार देखील प्रभावित झाला. दरम्यान, जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आंदोलक जिप्सी चालकांची बैठक घेऊन तोडगा काढण्याच्या सूचना केल्या. विविध मागण्या संदर्भात विभागीय समितीसह वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन देखील त्यांनी आंदोलकांना दिले. त्यामुळे हा बंद मागे घेण्यात आला. १४ मेपासून शहानूर येथील सफारी पूर्ववत सुरू झाल्याची माहिती संघटनेचे सचिव चंद्रशेखर गायकवाड यांनी दिली.