अकोला : महाराष्ट्रात गणेशोत्सवाची मोठी परंपरा लाभली आहे. यावर्षी राज्य महोत्सव म्हणून गणेशोत्सव साजरा करण्यात आला. गणेशोत्सवात भाविक मनोभावे गणरायाची आराधना करतात. महाराष्ट्र व संपूर्ण भारत देशासह आता सातासमुद्रापार देखील ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करण्यात येत आहे.
स्कॉटलंड देशातील अबर्डीन शहरात मराठी मंडळ अबर्डीन, नादब्रह्म ढोल समूह आणि अबर्डीन हिंदू मंदिर ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवसांचा रंगतदार गणेशोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. या उत्सवामुळे शहरात उत्साह आणि एकोप्याचे वातावरण निर्माण झाले. हा खरोखरच सर्वांसाठी आनंदाचा उत्सव होता, असे मूळचे अकोलेकर राजेश वानखडे यांनी सांगितले.
अकोल्यातील रेणुका नगर रहिवासी राजेश वानखडे हे स्कॉटलंड देशातील अबर्डीन शहरात स्थायिक झाले आहेत. त्याठिकाणी ते भारतीय संस्कृती व परंपरा जोपासतात. अबर्डीन येथे गणेशोत्सवाची सुरुवात पर्यावरणपूरक मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेने करण्यात आली. यामध्ये येथील भारतीय कुटुंबांसह लहान मुलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. त्यानंतर गणरायाची स्थापना करून दररोज मनोभावे पूजा व आरती करण्यात आली. त्यामुळे अबर्डीन शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांची ही मेजवानी लाभली. त्यामध्ये भारतीयांसह स्थानिक कलाकारांनी नृत्य, संगीत आणि विविध कलाप्रकार सादर केले. त्यामुळे रसिक मंत्रमुग्ध झाले होते.
ऐतिहासिक पहिलीच मिरवणूक; पुण्यावरून मागवले वाद्य
स्कॉटलंडच्या अबर्डीन शहरात ऐतिहासिक पहिलीच भव्य गणपतीची मिरवणूक या गणेशोत्सवात काढण्यात आली. यासाठी खास पुणे येथून ढोल, ताशे व इतर मिरवणूक साहित्य मागविण्यात आले होते. ढोल, ताशा, झांजच्या गजरात तेजस्वी ध्वजांसह शेकडो स्थानिक नागरिकांसह भारतीय सहभागी झाले होते. गणरायाच्या भव्य-दिव्य मिरवणुकीमुळे संपूर्ण परिसर दुमदुमला होता. गणपती अथर्वशीर्ष आवर्तन आणि पारंपरिक विसर्जन सोहळ्यानंतर स्कॉटलंडमधील गणेशोत्सवाचा समारोप झाला. या गणेशोत्सव सोहळ्याला अबर्डीन शहर महापालिका आणि स्कॉटलंड पोलिसांचे विशेष सहकार्याला लाभल्याचे आयोजकांनी सांगितले. स्कॉटलंडमध्ये भारतीयांनी महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा जोपासत गणेशोत्सव श्रद्धेने साजरा केला.
विविध पार्श्वभूमीचे लोक एकत्र
विविध पार्श्वभूमीचे लोक एकत्र येऊन गणेशोत्सवाचा आनंद अनुभवला. सातासमुद्रपलीकडे आपली गणेशोत्सवाची परंपरा जोपासतांना सर्वांना खूप आनंद व समाधान वाटले. यासाठी अबर्डीनमधील नागरिकांनी दाखवलेल्या प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा हा कौतुकास्पद होता, असे राजेश वानखडे म्हणाले.