अकोला : जिल्ह्यात अमली पदार्थ कायद्यांतर्गत दाखल ११ गुन्ह्यातील एकूण २२६ किलो ग्रॅम वजनाचा गांजा अमली पदार्थ कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत नष्ट करण्यात आला. विशेष अमली पदार्थ टास्क फोर्सच्या निर्देशानुसार व शासन निर्णयातील मार्गदर्शन सुचनेनुसार अंमली पदार्था मालाची विल्हेवाट मोहीम राबविण्यात आली. अकोला पोलीस दलाने अमली पदार्थाविरोधात मोहीम तीव्र करून कारवाईची मोहीम राबवली. यामध्ये आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले. जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ नष्ट करण्याची प्रक्रिया नागपूर येथे पूर्ण करण्यात आली आहे.
अमली पदार्थ नष्ट करण्याच्या समितीचे अध्यक्ष तथा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक कार्यवाही करण्यात आली. यासाठी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ तसेच नवी दिल्ली येथील सरकारी अफू आणि अल्कलॉइड कारखानाचे मुख्य नियंत्रकांची परवानगी प्राप्त झाली. त्यानुसार पोलीस मुख्यालयाच्या सीलबंद गोदामातून पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके व पंचांच्या उपस्थितीत चित्रीकरण करून मुद्देमाल बाहेर काढण्यात आला. त्याची छाननी करण्यात आली.
यामध्ये ११ गुन्ह्यांमधील जप्त गांजा २२६ किलो ग्रॅम महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने आदेशीत केलेल्या बुटीबुरी येथील स्थळी नेण्यात आला. त्याठिकाणी विशिष्ट पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्यात आली. या प्रक्रियेसाठी दोन सरकारी पंच उपस्थित होते. तसेच चित्रीकरणाद्वारे संपूर्ण प्रक्रिया नोंदविण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, पोलीस उपअधीक्षक उलेमाले, पोलीस निरीक्षक शंकर शेळके, गोपाल जाधव, गणेश पांडे, राजपालसिंग ठाकूर, विलास बंकावार, संदीप तवाडे, स्वप्निल चौधरी यांनी प्रत्यक्ष नागपूर येथे हजर राहून केली. अमली पदार्थाचा माल नष्ट करून त्याचे अधिकृत प्रमाणपत्र घेण्यात आले.
अमली पदार्थाचे निर्मूलन व समाजामध्ये जागृतीसाठी पोलीस विभाग सातत्याने कार्यरत असून भविष्यात देखील या प्रकारे कारवाई केली जाईल, असे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
अमली पदार्थामुळे आरोग्य आणि समाजावर नकारात्मक परिणाम
अमली पदार्थ हे असे रासायनिक पदार्थ आहेत, जे व्यक्तीला सुन्न करतात, पक्षाघात करतात किंवा भावना कमी करतात. हे पदार्थ मादक असू शकतात आणि व्यसनाधीनता निर्माण करू शकतात, ज्यामुळे आरोग्य आणि समाजावर नकारात्मक परिणाम होतो.