अकोला : शहरातील कृषी नगर भागात वर्चस्वातून दोन गटामध्ये झालेल्या हिंसक टोळीयुद्ध प्रकरणात १७ गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली. अकोला पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात तीव्र भूमिका घेऊन वर्षातील सर्वात मोठी कारवाई केली.

कृषी नगर येथे १७ जुलैला दोन गटात पूर्ववैमनस्यातून वर्चस्वासाठी टोळीयुद्ध भडकले. आरोपींनी हातात तलवारी, लोखंडी पाईप, कुऱ्हाड घेऊन गोळीबार देखील केला. या प्रकरणात सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात टोळीप्रमुखासह एकूण १७ आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गत १० वर्षांत गुन्ह्यातील आरोपी टोळी प्रमुख शुभम विजय हिवाळे, स्वप्निल प्रविण बागळे, आकाश सुनिल गवई, शंतनु गोपाल तायडे, अनिकेत उर्फ मल्हार विनोद गवई, धम्मपाल उर्फ धम्मा शामराव तायडे, अनिकेत दिपक सावळे, निखील उर्फ बंटी भिमराव चराटे, आकाश उर्फ दादु पुरुषोत्तम खडसे, ऋषिकेश नरेंद्र तायडे, आदित्य उर्फ मामा प्रेमदास कांबळे, विवेक उर्फ विक्की नरेंद्र तायडे, प्रज्वल राजेश अरखराव, राज रमेश डोळे, अभिजीत विश्वनाथ वैरागड व सागर विलास कांबळे यांच्या विरूद्ध गंभीर दुखापत करणे, घातक शस्त्रांनी हल्ले करणे, हत्येचा प्रयत्न, जबरी चोरी, दंगा, बेकायदेशीर जमाव जमविणे, अश्लील शिवीगाळ करणे आदी गंभीर गुन्हे आहेत. बहुतेक आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून गत दहा वर्षांत त्यांच्या विरोधात विविध प्रकरणांत दोषारोपपत्र दाखल आहेत.

टोळी प्रमुख शुभम हिवाळे वेगवेगळ्या गुन्हेगारांना हाताशी धरुन गुन्हे करीत असल्याचे समोर आले. त्यामुळे टोळीप्रमुख व टोळीतील सदस्य आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अंतर्गत प्रस्ताव तयार करुन मंजुरीसाठी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे सादर करण्यात आला होता. गुन्ह्यात कलम ३(१) (ii), कलम ३ (२) व कलम ३(४) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ वाढ करण्यास मंजुरी मिळाली. गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके, माजीद पठाण, ज्ञानेश्वर सैरिसे, उदय शुक्ला, सिव्हिल लाईन पोलीस आदींनी केली. जिह्यात टोळीने गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर मक्को कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अर्चित चांडक यांनी दिला आहे.