अकोला : न्यायालयातील वरिष्ठ अधिकारी महिलेचा चक्क वकिलानेच मानसिक छळ केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे न्यायालयीन वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. या प्रकरणी संबंधित वकिलाविरुद्ध विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी वकिलाला पोलिसांनी तात्काळ अटक करून त्याला न्यायालयात हजर केले. संबंधित आरोपीला न्यायालयाने २२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सौरभ दीपांकर तेलगोटे (३५, रा. सरस्वती विहार क्रमांक ७, मलकापूर, अकोला) असे आरोपी वकिलाचे नाव आहे.
समाजामध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. न्यायाचे मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या न्यायालयात देखील आता महिला सुरक्षित नाहीत का? असा प्रश्न निर्माण होतो. न्यायालयात कार्यरत वरिष्ठ अधिकारी पदावरील महिलेचा वकिलाने मानसिक छळ करून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. पीडित महिला अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी सौरभ तेलगोटे गत अनेक दिवसांपासून त्यांना विविध मार्गाने मानसिक त्रास देत होता. विनाकारण त्यांच्या दालनासमोरून दिवसांतून अनेक वेळा फिरणे, काम नसताना कार्यालयात हजर राहणे, एकटक पाहणे, वाहनतळाजवळ उभे राहून हातवारे करणे, चारचाकी वाहनाचा शासकीय निवासस्थानापर्यंत पाठलाग करणे, शासकीय निवासस्थानाबाहेर उभे राहून स्थानिक रहिवाशांना नावानिशी पत्ता विचारणे असे अनेक विचित्र प्रकार आरोपी वकील करीत होता.
सातत्याने हा त्रास वाढत गेला. आरोपीने समाज माध्यमातून अश्लील संदेश पाठवण्याचे प्रताप सुद्धा केले. न्यायालयातील इतरही महिला अधिकाऱ्यांच्या नावांचा उल्लेख करून शिवीगाळ करण्यास त्याने सुरुवात केली. सौरभ तेलगोटे याने ५ जुलै रोजी महिला अधिकाऱ्याच्या दालनात सुद्धा गोंधळ घातला. त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी तेलगोटे याला अडविण्याचा प्रयत्न केला असता, त्याने सुरक्षा रक्षकांशी हाणामारी केली. दालनात जबरदस्तीने प्रवेश करून अतोनात त्रास दिला.
आरोपी वकिलाच्या सततच्या त्रासाला कंटाळून महिला अधिकाऱ्याने वकिल सौरभ तेलगोटे याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी सौरभ तेलगोटे याच्याविरोधात बीएनएस कलम ७४, ७५, ७८, १३२, ३५१ (२), ३५१ (३), ६६ (सी), ६७ नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.न्यायालयातील वरिष्ठ अधिकारी पदावर कार्यरत महिलेला देखील चक्क वकिलाच्या मानसिक त्रासाला सामना करावा लागल्याने मोठी खळबळ उडाली. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.