अकोला : मुजोर ऑटो चालकांच्या बेशिस्तपणामुळे शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. याची गंभीर दखल शहर वाहतूक शाखेने घेऊन एकाच दिवसांत तब्बल १०४ ऑटो जप्त केले. या कारवाईतून वाहतुकीला शिस्त लावण्याचे प्रयत्न पोलिसांनी केले. ऑटोमधून गांजाची तस्करी करण्यात येत असल्याचा प्रकार देखील समोर आला आहे. अकोला शहरातील वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत.

अगोदरच खड्डेमय रस्त्यांमुळे वाहन चालवणे अवघड होते. त्यातच ऑटो चालकांचा बेशिस्तपणा व नियमभंग करण्याच्या प्रकारामुळे वाहतूक खोळंबते. अनेक वेळा ऑटो चालकांचा बेशिस्तपणा अपघातासाठी देखील कारणीभूत ठरतो. शिवाय ऑटो चालक दादागिरी सुद्धा करीत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांना विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याचे आदेश दिले. शहर वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत शहरातील बेशिस्त ऑटोरिक्षा चालकांवर मोटार वाहन कायद्याप्रमाणे विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात आली.

या विशेष मोहीमेदरम्यान शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील तीन पोलीस अधिकारी व २४ अंमलदार यांनी बसस्थानक चौक, रेल्वे स्थानक चौक, गांधी चौक व शहरातील मुख्य चौकामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑटो रिक्षा चालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये विविध नियमांचे उल्लंघन करणारे १०४ ऑटो जप्त केले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून् वाहतूक नियमांवर समुपदेशन करण्यात आले. ऑटो रिक्षा चालकांनी रिक्षा चालवतांना ऑटो स्टॅन्डचा वापर करावा, रस्त्यावर ऑटो उभे करू नये, वाहतुक नियमांचे उल्लंघन कदापी होऊ नये, ऑटो चालवतांना सोबत वाहनांचे कागदपत्रे बाळगावे, गणवेश परिधान करावा, क्षमतेपेक्षा जास्त शाळकरी मुलांची वाहतूक करू नये, परवान्या पक्षा जास्त प्रवासी वाहतूक होऊ नये, वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे, वाहनावरील दंड प्रलंबित ठेऊ नये, दंड असल्यास त्वरित वाहतूक पोलीस किंवा शहर वाहतुक कार्यालय भरावा, आदी सूचना ऑटो चालकांना देण्यात आल्या आहेत.

ऑटोतून १५ किला गांजा जप्त; दोन आरोपी गजाआड

रेल्वेस्थानकावरील मालधक्का येथून ऑटोमधून गांजाची तस्करी केल्या जात असल्याची माहिती रामदासपेठ पोलिसांना मिळाली. त्या माहितीवरून पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान सवारी ऑटोमणून १५ किला ७६० ग्राम गांजा जप्त केला. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.