अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या नेत्याच्या मुलावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील आदर्श कॉलनी भागात शुक्रवारी घडली. यामध्ये नेत्याचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शस्त्रक्रियादेखील करण्यात आली आहे. त्यामुळे नेत्याच्या संतप्त समर्थकांनी हल्ला करणाऱ्यांच्या घराची तोडफोड करून घरासमोरील मोटार जाळल्याचा प्रकार सायंकाळी घडल्याची माहिती आहे. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली असून कारवाई सुरू आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे हे बाहेरगावी होते. शेजारी राहणाऱ्या इंगोले कुटुंबातील एका सदस्याने याचा फायदा घेऊन यश पातोडे याच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये तो अत्यंत गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर तत्काळ शस्त्रक्रिया देखील करण्यात आली आहे. कान, डोके, आतडे आदी भागाला गंभीर दुखपत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्राणघातक हल्ल्यामुळे राजेंद्र पातोडे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्ये संतप्त भावना निर्माण झाली. राजेंद्र पातोडे यांचे समर्थक आणि कार्यकर्ते आदर्श कॉलनीमध्ये दाखल झाले. हल्ला करणाऱ्या इंगोले कुटुंबाच्या घरावर प्रचंड हल्ला चढवला. घराची आणि घरातील वस्तूंची समर्थकांकडून प्रचंड तोडफोड करण्यात आली आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांनी घराच्या अंगणात उभी असलेल्या मोटारीला देखील पेटवून दिल्याची माहिती समोर येत आहे. राजेंद्र पातोडे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी संतप्त भावनेतून इंगोले कुटुंबाच्या घरावर हल्ला करून तोडफोड केल्याची माहिती आहे.

आदर्श कॉलनीत या वादातून मोठा गोंधळ झाला. हल्लेखोराच्या घराची तोडफोड करून घरासमोरील मोटार जाळल्याची माहिती मिळताच खदान आणि स्थानिक गुन्हे शाखेने घटनास्थळावर धाव घेतली. पोलिसांनी समर्थक कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात खदान पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे. राजेंद्र पातोडे हे देखील तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली.

गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला वाद

गणेश चतुर्दशी ६ सप्टेंबरला असल्याने विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी करण्यात आली. अकोला शहरातून भव्य-दिव्य विसर्जन मिरवणूक काढण्याची मोठी परंपरा आहे. विसर्जन मिरवणुकीच्या पूर्व संध्येला आदर्श कॉलनीत मोठा वाद झाल्याने खळबळ उडाली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवून पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.