अकोला : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी सर्वच पक्ष स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरले आहेत. शिवाय नाराज बंडखोरांनी देखील दंड थोपाटले आहेत. उमेदवारांची भाऊगर्दी असून विजयाचे समीकरण जुळवण्याची कसरत सुरू झाली. त्यातूनच काहींच्या माघारीसाठी मनधरणी सुरू झाली आहे.
पश्चिम विदर्भातील अकोला जिल्ह्यात अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूर नगर पालिका आणि हिवरखेड व बार्शीटाकळी नगर पंचायतसाठी निवडणूक होत आहे. वाशीम जिल्ह्यातील वाशीम, रिसोड, कारंजा, मंगरुळपीर नगरपालिका आणि मालेगाव नगर पंचायतीची निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपुष्टात आली. शेवटच्या दोन दिवसांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अक्षरश: झुंबड उडाली.
अकोला जिल्ह्यात सदस्य पदासाठी अकोट २४५, मूर्तिजापूर १८९, बाळापूर ११३, तेल्हारा ११७, हिवरखेड १२९, बार्शीटाकळी १३८ असे एकूण ९३१ अर्ज दाखल झाले, तर सहा नगराध्यक्ष पदासाठी ७२ जण रिंगणात आहेत. यामध्ये अकोट १६, मूर्तिजापूर १२, बाळापूर १३, तेल्हारा आठ, हिवरखेड ११ आणि बार्शीटाकळी येथे १२ अर्ज दाखल झाले. वाशीम जिल्ह्यात सुद्धा नगर पालिका व एका नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी ८३, तर सदस्य पदासाठी एक हजार ६३ अर्ज दाखल झाले आहेत. छाननीमध्ये त्यापैकी काही बाद झाले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील नसलेल्या ठिकाणी २१ नोव्हेंबरपर्यंत, तर अपील असलेल्या ठिकाणी २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.
निवडणुकीचा जाहीर प्रचार सुरू होण्यापूर्वी आता विजयाचे समीकरण कसे जुळणार या दृष्टीने गणित मांडले जात आहे. दोन्ही जिल्ह्यांमध्ये रिसोडचा अपवाद वगळता इतर ठिकाणी महायुती अस्तित्वात आली नाही. भाजपने सर्व ठिकाणी उमेदवार दिले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना शिंदे गटाने देखील मिळेल, त्या ठिकाणी उमेदवार उभे केले. वाशीम जिल्ह्यात महाविकास आघाडी अस्तित्वात आली.
अकोला जिल्ह्यात सुद्धा काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गट काही ठिकाणी एकत्र, तर निवडक ठिकाणी स्वबळावर निवडणुका लढत आहेत. कार्यकर्त्यांची ही निवडणूक लढण्याच्या सर्वच पक्षांच्या भूमिकेमुळे निवडणूक रिंगणातील उमेदवारांची गर्दी वाढली. काहींनी खबरदारी म्हणून उमेदवारी दाखल करून ठेवली आहे. समीकरण जुळवून आणण्यासाठी आता इतरांना माघार घेण्यासाठी मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. विशेषत: बंडोबांचे बंड थंड करण्याचे मुख्य लक्ष्य आहे. त्यावरून पुढील समीकरण ठरण्याची चिन्हे आहेत.
‘स्थानिक’मध्ये ‘महायुती’चे जुळलेच नाही
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती व आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिले होते. जागा वाटप तर सोडाच, मात्र युती करण्यासंदर्भात साधी चर्चा देखील झाली नसल्याची माहिती आहे. त्या तुलनेत महाविकास आघाडीने अनेक ठिकाणी जुळवून घेतल्याचे चित्र आहे.
