नागपूर : दिल्लीतील भोगल मार्केट परिसरात एका आरोपीने सराफा दुकान फोडून २५ कोटींचे दागिने चोरून नेले. एकट्याने स्ट्राँग रूम फोडून ३२ लॉकर्समधील दागिने आणि पाच लाखांची रक्कम पळविली. शेजारच्या इमारतीवरून चढून त्याने ही चोरी केली. दुकानातील सीसीटीव्ही आणि सायरन यंत्रणाही निकामी केली. अलिकडच्या काळातील देशातील ही सर्वात मोठी चोरी मानली जाते. या घटनेच्या पृष्ठभूमीवर नागपुरातील बँका आणि सराफा दुकानांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. बँक आणि सराफा ओळीतील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.
छत्तीसगडच्या रायपूर येथील आरोपी लोकेश श्रीवासने दिल्लीत जाऊन सराफा दुकान फोडले. या घटनेवरून नागपुरातील सुरक्षा व्यवस्था सतर्क करण्यात आली आहे. परप्रांतातील टोळीकडून नागपुरात चोरीचा प्रयत्न नाकारता येत नाही. त्यादृष्टीने व्यापारी परिसरात नजर ठेवण्यात येत आहे. दिल्लीसारख्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने दिशानिर्देश देण्यात आले असून शक्य ती उपाययोजना करण्यात येत आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनात शहरातील सुरक्षा व्यवस्था कडेकोट आहे.
देशातील सर्वात मोठी बँक चोरी
देशातील सर्वात मोठी बँक चोरी केरळच्या मल्लापूरम येथे २००७ मध्ये झाली. मल्लापूरम परिसरात एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर साऊथ मालाबार ग्रामीण बँकेचे कार्यालय होते. चोरांनी तळ मजला भाड्याने घेतला. रेस्टॉरंट सुरू करण्याचा देखावा करीत सर्वांना विश्वासात घेतले. ३० डिसेंबर २००७ ला तळ मजल्यावरूनच बँकेची स्ट्राँग रूम फोडून ८० किलो दागिने आणि ८५ लाख रुपये एका रात्रीत पळविले.